अलिबाग : रायगड लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान होत असून प्रचारासाठी सातच दिवस उरले आहेत. त्यामुळे उमेदवारांबरोबर त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी व नेतेही प्रचारात उतरले आहेत. आपल्या भागात कोणाचा वाढदिवस असो की लग्न किंवा अंत्यविधी तेथे हे राजकीय लोक पोहोचत आहेत.स्थानिकांच्या गाठीभेटी घेत मतदारांपर्यंत पोहोचून संपर्क वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या लग्नसराई सुरू असून येथील गर्दी प्रचारासाठी आयती मिळत आहेत. तेथेही राजकीय लोकांचे जत्थेच्या जत्थे पोहोचत आहेत. तालुका आणि जिल्ह्यातील नेतेमंडळी यानिमित्त गावात पायधूळ झाडत आहेत.साहेब येताहेत, अक्षता थांबू देत!एका लग्नसोहळ्यात वरपित्याने तर कहरच केला. आपल्या नेत्यासाठी चक्क मुहूर्त टाळला. मुहूर्त दुपारी १२:३५ वाजताचा होता, पण अक्षता पडायला दीड वाजला. लग्नासाठी नेत्याला आमंत्रण दिले होते. नेता तास-दीड तास उशिरा आला. पण तोपर्यंत वरपित्याने लग्न थांबवून ठेवले. नेता आल्यावर मंगलाष्टका झाल्या.वधू-वरांच्या हातात मतदानाच्या आवाहनाचे फलक -निवडणूक आयोग यावर्षी ७५ टक्केपेक्षा जास्त मतदानासाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी आता ते थेट लग्न सोहळ्यातही प्रबोधन करीत आहेत. लग्नासाठी मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात, हे लक्षात घेत वधू-वरांच्या हातात मतदानाच्या आवाहनाचे फलक दिले जात आहेत.
लग्न, वाढदिवस आणि अंत्यविधीतही राजकीय पुढारी
By निखिल म्हात्रे | Published: May 04, 2024 9:50 PM