नागोठणेत निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:33 AM2018-02-20T01:33:58+5:302018-02-20T01:34:00+5:30
निवडणूक २७ फेब्रुवारीला होत असून, शुक्र वारी सायंकाळी निवडणूक आयोगाच्या वतीने उमेदवारांना निशाणी देण्यात आल्यानंतर रविवारपासून संबंधित राजकीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ते प्रचाराला लागले आहेत.
नागोठणे : ग्र्रामपंचायतीची निवडणूक २७ फेब्रुवारीला होत असून, शुक्र वारी सायंकाळी निवडणूक आयोगाच्या वतीने उमेदवारांना निशाणी देण्यात आल्यानंतर रविवारपासून संबंधित राजकीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ते प्रचाराला लागले आहेत. सरपंचपदासह काही प्रभागांत तिरंगी लढती होणार असल्याने तीनही आघाड्यांची दमछाक होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना-काँग्रेस सत्ताधारी आघाडीची जनसेवा आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप आघाडीची नागोठणे बचाव आघाडी अणि भाजपा पुरस्कृत नागोठणे विकास आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे. निवडणुकीत सेनेने विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक यांना, तसेच राष्ट्रवादी-शेकाप आघाडीने माजी सदस्य बाळासाहेब टके, तर भाजपाने सेनेचे रोहे तालुका संघटक तथा माजी सरपंच विलास चौलकर यांना सरपंचपदाची उमेदवारी दिली असल्याने ही लढत चुरशीची होईल, असे बोलले जात आहे. सदस्यपदाच्या १७ जागांसाठी सहा प्रभागांतून ४२ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग २ आणि ५मध्ये सरळ लढती असल्या, तरी उर्वरित चार प्रभागांमध्ये बहुरंगी लढती होत आहे. सेनेने पाच विद्यमान सदस्यांना पुन्हा रिंगणात उतरविले आहे. सेनेचे विद्यमान सदस्य प्रकाश मोरे यांना सेनेने पुन्हा तिकीट नाकारल्याने भाजपा आघाडीतून ते पुन्हा रिंगणात उतरले असल्याने, प्रभाग ६मधील लढत निश्चितच रंगतदार होणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीने दोन विद्यमान सदस्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली असल्याने, सरपंचपदासह नऊ विद्यमान सदस्य पुन्हा एकदा जनमत अनुभवत असल्याचे स्पष्ट होत आहे.