राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज

By admin | Published: October 10, 2016 03:37 AM2016-10-10T03:37:57+5:302016-10-10T03:37:57+5:30

रायगड जिल्ह्यातील राजकारण नेहमीच स्फोटक राहिले आहे. या राजकीय मैदानातील मंडळी कोणत्या वेळी कोणती रणनीती आखतील आणि कोणाला सोबत करतील

Political parties ready for elections | राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज

राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज

Next

आविष्कार देसाई / अलिबाग
रायगड जिल्ह्यातील राजकारण नेहमीच स्फोटक राहिले आहे. या राजकीय मैदानातील मंडळी कोणत्या वेळी कोणती रणनीती आखतील आणि कोणाला सोबत करतील याचा नेम नाही. नगर पालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा अशा एकामागून एक निवडणुका आगामी काळात येऊ घातल्या आहेत. जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व असणाऱ्या शेतकरी कामगार पक्ष-राष्ट्रवादी काँग्रेसने युतीची घोषणा केली आहे. शिवसेना, भाजपा यांनी एकला चलो रेचा नारा दिला असताना काँग्रेसने अद्यापही आपले पत्ते उघड केलेले नाहीत.
मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवडणुका म्हणून स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे पाहिले जाते. नगर पालिकांची मुदत ही डिसेंबर महिन्यात संपत आहे, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषेदेच्या निवडणुका या मार्च २०१७ मध्ये होऊ घातल्या आहेत. नगर पालिकेच्या प्रभाग रचनेनंतर त्यातील आरक्षणही जाहीर झाले आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षही थेट निवडला जाणार असल्याने काही दिवसांपूर्वी सरकारने त्याचीही सोडत जाहीर केली आहे. त्यामुळे नगर पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सर्वप्रथम पाहायला मिळणार आहे. नगर पालिकेच्या निवडणुकीत उडणारा राजकीय धुराळा खऱ्या अर्थाने पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपर्यंत खाली बसणार नाही.
जिल्हा परिषदेवर शेकाप- राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील यांच्या मैत्रीचे संबंध पुन्हा जुळून आल्याने त्यांची युती याही निवडणुकीत अभेद्य राहणार असल्याचा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला आहे. दोन्ही दिग्गज नेते एकत्र असल्याने शिवसेना, भाजपा, काँग्रेसच्या उरात पुन्हा धडकी भरल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ग्रामीण राजकारणावर चांगलीच पकड आहे. त्यांना खऱ्या अर्थाने शिवसेनेसोबतच टक्कर द्यावी लागणार आहे. भाजपाला या निवडणुकीत मेहनत घ्यावी लागणार आहे. पिछाडीवर असणाऱ्या काँग्रेसलाही अपार कष्ट करावे लागणार आहेत. काँग्रेसने आपापसातील मतभेद विसरुन एकदिलाने लढा दिल्यास सत्ताधाऱ्यांना मिळणाऱ्या मोकळ््या रानावर निर्बंध येऊ शकतात. काँग्रेस आपापसात लढत राहिल्यास सत्ताधाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे हे काँग्रेसने आताच ओळखले पाहिजे, अन्यथा पुन्हा एकदा आघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस विकास कामांच्या जोरावर ग्रामीण जनतेपुढे जाणार आहे परंतु सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत केलेल्या बोगस विकास कामांचा पर्दाफाश करण्याची तयारी काँग्रेसचे अलिबागमधील माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी सुरु केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्यांनी फुंकलेले रणशिंग जिल्ह्यातील काँग्रेसला उभारी देऊ शकते. तर दुसऱ्या बाजूला शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीत काँग्रेसला सामावून घेण्यात येत असल्याची राजकीय चर्चा आहे.
सुनील तटकरे आणि जयंत पाटील हे स्वार्थी राजकारणासाठी एकत्र आल्याची घणाघाती टीका शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई यांनी रोहे येथे केली होती. त्यामुळे शिवसेना तटकरे-पाटील या जोडगोळीलाच आपले लक्ष्य करणार असल्याचे दिसून येते. भाजपानेही एकाकी लढण्याचे मनसुबे आखले आहेत.

Web Title: Political parties ready for elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.