राजकीय पक्ष महिला उमेदवाराच्या शोधात
By admin | Published: November 16, 2015 02:18 AM2015-11-16T02:18:45+5:302015-11-16T02:18:45+5:30
नगरपंचायत निवडणुकांचे वारे वाहू लागले असून सर्वच राजकीय पक्षांच्या गुप्त बैठका सुरू झाल्याने निवडणुकीचे वातावरणही तापणार आहे
पोलादपूर : नगरपंचायत निवडणुकांचे वारे वाहू लागले असून सर्वच राजकीय पक्षांच्या गुप्त बैठका सुरू झाल्याने निवडणुकीचे वातावरणही तापणार आहे. मात्र पोलादपूर नगरपंचायतीचे आरक्षण हे सर्वसाधारण महिला स्त्री राखीव जागेसाठी आरक्षित झाल्याने नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्या पुरुष उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. मात्र सर्वच राजकीय पक्ष आता सक्षम स्त्री उमेदवाराचा शोध घेत आहेत.
सोमवारी (९ नोव्हेंबर) रायगड जिल्ह्यातील नगरपंचायतीचे आरक्षण मंत्रालयात जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षीयांच्या गुप्त बैठकांना जोर चढला असून निवडणुकांचे वातावरण तापू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली असून पोलादपुरात एकूण १७ प्रभाग व १७ नगरसेवकांची संख्या आहे. सद्यस्थितीत काँग्रेस व शिवसेना जोरात आहेत. तर भाजपा, मनसे, शेकाप व राष्ट्रवादी असे सर्वच राजकीय पक्ष १७ च्या १७ जागा स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवित आहेत. खरी चुरस काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षात होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या नगरपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षण व सदस्यत्वाचे आरक्षण पडल्यावर अनेक इच्छुकांना नगराध्यक्षपदाचे वेध लागले होते. परंतु पोलादपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची माळ स्त्री उमेदवाराच्याच गळ्यात पडणार हे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीमध्ये दिग्गज, रथी-महारथी निवडणूक मैदानात उतरतील यात श्ांका नसून आता सर्वांचे लक्ष नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम के व्हा जाहीर होतोय याकडे लागून राहिले आहे. इच्छुक महिला उमेदवारांच्या शोधात राजकीय पक्ष गुंतले आहेत.