शेकापच्या पाठबळावर फिरतेय राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 01:00 AM2019-04-18T01:00:49+5:302019-04-18T01:02:48+5:30

स्थानिक राजकारणावर शेतकरी कामगार पक्षाचाच प्रभाव असल्याने तो पक्ष ज्याच्यासोबत त्याची स्थिती तुलनेने दिलासादायक असल्याचा प्रत्यय या निवडणुकीतही येतो आहे.

Politics on the backing of the Peacock support | शेकापच्या पाठबळावर फिरतेय राजकारण

शेकापच्या पाठबळावर फिरतेय राजकारण

Next

- जयंत धुळप
प्रकल्पांचा जिल्हा म्हणून ओळख बनलेल्या रायगडवरील वर्चस्वासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कितीही झुंजत असली, तरी येथील स्थानिक राजकारणावर शेतकरी कामगार पक्षाचाच प्रभाव असल्याने तो पक्ष ज्याच्यासोबत त्याची स्थिती तुलनेने दिलासादायक असल्याचा प्रत्यय या निवडणुकीतही येतो आहे.
चारवेळा निवडून आलेले अनंत गिते यांना प्रस्थापितांविरोधी नाराजीचा सामना करावा लागतो आहे. मागील निवडणुकीत त्यांना दिलेला पाठींबा काढून घेत निसटता पराभव पत्करावा लागलेले राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यासोबत यावेळी शेकाप आहे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी, त्यांच्या नेत्यांशी पूर्वी असलेले वाद मिटवले आहेत.
रायगडमध्ये आलेले किंवा येऊ घातलेले प्रकल्प, त्यातील विस्थापित, रेल्वेचे रखडलेले प्रकल्प, जलवाहतूक किंवा बंदरांचे प्रश्न यापैकी एकही मुद्दा ठळकपणे प्रचारात नाही. मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा काही प्रमाणात सभा गाजवतो, पण तेवढ्यापुरताच. गीतेंनी तटकरेंच्या कथित भ्रष्टाचारावर प्रचारात भर दिला आहे, तर तटकरेंनी गीतेंच्या निष्क्रियतेवर. मंत्रीपद असूनही गीते एकही मोठा उद्योग किंवा प्रकल्प आणू न शकल्यावर आणि त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटत नसल्यावर त्यांचा भर आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा जो भाग या मतदारसंघात येतो, तेथे फळबागायतदारांचा प्रश्न काहीसा चर्चेत येतो. त्यामुळे प्रचारात ठोस मुद्यांचा अभाव आहे. खासदारांची कामे, त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा, केंद्र सरकारची कामगिरी- तेथून जिल्ह्याला काय मिळाले, यासारखे मुद्दे गौण होत वैयक्तिक हेवेदावे, उमेदवारांची क्षमता-दर्जा याभोवती भाषणे फिरताना दिसतात.


राष्ट्रवादीतील वाद मिटवण्याबरोबरच शेकापचा पाठींबा, काँग्रेसची नाराजी दूर करण्यात वेळीच यश आल्याचा परिणाम तटकरेंच्या प्रचारावर दिसतो आहे. रायगड जिल्ह्याच्या मोजका भाग वगळता भाजप हवा तितका प्रबळ नसल्याने शिवसेनेला या मतदारसंघात एकाकी खिंड लढवावी लागते आहे. युतीतील पक्ष म्हणून भाजप, त्यांचे नेते सोबत आहेत, पण त्याचा परिणाम रत्नागिरीत तुलनेने अधिक दिसतो आहे. नवमतदारांचे प्रमाण वाढते असूनही प्रचारसभांत तरूणांची संख्या नगण्य असल्याचे अस्वस्थ करणारे चित्र या मतदारसंघात पाहायला मिळते.

>भ्रष्टाचारी व्यक्तीला रायगड-रत्नागिरीचे मतदार खासदार म्हणून कधीही निवडून देणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. बलशाली भारत बनवायचा असेल, तर देशाचे नेतृत्व पुन्हा एकदा मोदींकडे असणे आवश्यक आहे.
- अनंत गीते, शिवसेना
>मतदारांना नेहमी फसवता येत नाही. निष्क्रीय खासदार सर्वांना अनुभवण्यास मिळाले. त्यांना रायगडचा मतदार पुन्हा स्वीकारणार नाही. माझ्या कारकिर्दीत आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून केलेली विकासकामे मतदारांसमोर आहेत. डुप्लिकेट उमेदवार कितीही उभे केले, तरी माझा विजय नक्की.
- सुनील तटकरे, राष्ट्रवादी
>कळीचे मुद्दे
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्णावस्थेतील काम आणि कोकण रेल्वेच्या गंभीर बनत गेलेल्या विविध समस्या.
अवजड उद्योगमंत्री असतानाही गीतेंनी एकही कारखाना, मोठा उद्योग आणला नाही. बेरोजगारी कमी होण्याऐवजी प्रचंड वाढल्याची टीका.

Web Title: Politics on the backing of the Peacock support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.