पनवेल : एक वेळा राजकारण सोडीन; पण भाजप सोडणार नाही, असा ठाम निर्धार भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. नव्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत. आमदार प्रशांत ठाकूर हेही घरवापसी करणार, अशा आशयाचे वृत्त मागील काही दिवसांपासून प्रसारमाध्यमातून चर्चिले जात आहे. त्यावर बोलताना प्रशांत ठाकूर यांनी घरवापसीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
पक्षाने माझ्यावर रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष, तसेच प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेल्या सिडको महामंडळाची जबाबदारी दिली. पक्षाने माझ्यावर मोठा विश्वास दाखविला आहे. रायगड जिल्ह्यात पनवेलमधून मी स्वत:, पेणमधून रवि पाटील तर उरणमधून अपक्ष म्हणून महेश बालदी निवडून आले आहेत, त्यामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद पूर्वीपेक्षा जास्त वाढली आहे. भाजपचा कार्यकर्ता म्हणून जिल्ह्यात पक्ष अधिकाधिक वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सदैव करणार असल्याचे प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा अनेक आमदारांचा मनोदय असल्याचे वृत्त विविध वृत्तवाहिन्यांतून प्रसारित केले जात आहे. चर्चेत असलेल्या त्या सर्व आमदारांना मी व्यक्तिश: ओळखतो, ते दुसऱ्या पक्षात जाण्याची चूक करणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सरकार बदलेले म्हणून आपणही त्या सरकारमध्ये सामील व्हावे, या मताचा मी नाही. माझ्या पक्षांतराच्या बातम्या बिनबुडाच्या आहेत.
काहीही झाले तरी मी भाजपचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे इतर पक्षात जाण्याचा कुणीही संदर्भ जोडू नये, असे सांगतानाच वेळ आल्यास राजकारण सोडीन; पण भारतीय जनता पक्ष सोडणार नाही, असा स्पष्ट निर्धार ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.माझ्या पक्षांतराच्या बातम्या बिनबुडाच्या आहेत. मी भाजपचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे इतर पक्षात जाण्याचा कुणीही संदर्भ जोडू नये, असे प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.