बिरवाडी : राजकारणाच्या घोडेबाजारामध्ये पक्षनिष्ठेचे महत्त्व कायम असल्याचे प्रतिपादन महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांनी केले आहे.महाड तालुक्यातील ढालकाठी येथील शिवनेरी या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी आमदार गोगावले बोलत होते. माणगाव तालुक्यातील गोरेगाव जिल्हा परिषद मतदार संघातील गावडी विभागातील वाडगाव कोंड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रामचंद्र गावडे, पुरुषोत्तम विठोबा गावडे, पिलाजी शिरगावकर, अनंत लकेश्री, निवृत्ती गावडे, मुरलीधर कोदे, लक्ष्मण गावडे, सुशील गावडे, संकेत लेके, तुकाराम सोनू गावडे, विनय शिरगावकर, धोंडू गावडे, गणेश गावडे, चंद्रकांत शिरगावकर, रमेश मधुकर गावडे, तुळशीदास गोपाळ गावडे, जनार्दन बाळकृष्ण गावडे यांनी आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.या प्रसंगी प्रवेश कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार गोगावले यांनी राजकारणाच्या घोडेबाजारामध्ये पक्षनिष्ठेचे महत्त्व कायम असल्याने, सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येऊ शकतो, त्यामुळेच सामान्य शिवसैनिक सरपंच, आमदार असा राजकीय प्रवास करीत आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.इतर राजकीय पक्षांच्या तुलनेने शिवसेनेतच सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला जातो, म्हणून शेतकरी कुटुंबातील तसेच रिक्षाचालक असे सामान्य कार्यकर्ते आमदार सभापती जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतात, ही किमया फक्त शिवसेनेतच होऊ शकते म्हणून शिवसेनेच्या प्रवाहात तरुणवर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत आहे, असा दावा आमदार गोगावले यांनी केला आहे.
राजकारणाच्या घोडेबाजारामध्ये पक्षनिष्ठेचे महत्त्व कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 2:40 AM