कोरोनामुळे झालीखालापूर तालुका आरोग्य यंत्रणेची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 12:13 AM2020-07-22T00:13:42+5:302020-07-22T00:14:01+5:30

नियमावर बोट ठेवत रुग्णांच्या जीवाशी खेळ

Polkhol of Jhalikhalapur taluka health system due to corona | कोरोनामुळे झालीखालापूर तालुका आरोग्य यंत्रणेची पोलखोल

कोरोनामुळे झालीखालापूर तालुका आरोग्य यंत्रणेची पोलखोल

Next

- अंकुश मोरे

वावोशी : व्हेंटिलेटरवर असलेल्या खालापूर तालुक्यातील आरोग्यसेवेचा पंचनामा कोरोनाने मांङला असून, कोरोनाच्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या थैमानात व्हेंटिलेटर बेडची सोय प्रशासन करू शकलेले नाही. नियमावर बोट दाखवत, रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे. मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे आटोक्यात असलेला कोरोनाने मे महिन्यानंतर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. १७ जुलैपर्यंत ४३७ रुग्ण आणि १६ मृत्यू अशी आकडेवारी हादरविणारी आहे.

पनवेल, नवी मुंबई वेस ओलांडलेल्या व्यक्तीमुळे कोरोनाचा शिरकाव तालुक्यात सुरू झाला. खालापूर तालुक्याचा प्रचंड विस्तार असतानाही कोरोना रुग्णांसाठी कोणतीच उपाययोजना प्रशासनाने तालुक्यात केली नाही. सापडलेला कोरोना रुग्ण इंडिया बुल आणि पनवेल येथे पाठविला जात आहे. पनवेलच्या दररोज शेकड्याने वाढणाऱ्या आकड्यांमुळे रुग्णालये भरून जात असताना, खालापूर तालुक्यातील रुग्णांची फरफट सुरू झाली.

इंडिया बुलमध्ये गेलेल्या रुग्णाचे अनुभव ऐकून शक्य त्यांनी होम क्वारंटाइन होण्यास सुरुवात केली. खोपोलीतील पार्वती रुग्णालयात सहा कोरोनाबाधित उपचार घेऊन बरे झाल्यानंतर रुग्णालय काही दिवस प्रशासनाने सील केले होते. यावरून प्रशासन केवळ नियमावर बोट ठेवत असून, रुग्णसंख्येशी काही देणंघेणं नसल्याच्या प्रकाराने संताप व्यक्त झाला होता. त्यानंतर मात्र, तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी पार्वती हॉस्पिटलचे डॉक्टर रणजीत मोहिते यांची कोरोना उपचारासाठी तळमळ पाहून कोविड रुग्णांसाठी खासगी रुग्णालय उभे राहिले, परंतु बेडची मर्यादा असून, तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे अतिदक्षता बेडची गरज वाढत आहे.

सध्याच्या कोरोना परिस्थितीतही तालुक्यात आरोग्य यंत्रणेकडे एकाही व्हेंटिलेटर बेडची सोय नसून, केवळ आॅक्सिजनची सोय असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी प्रसाद रोकडे यांनी सांगितले. खोपोलीसारख्या शहरात दररोज कोरोनाबाधित रुग्ण आढळत असताना, केवळ ४३ बेडची व्यवस्था असून, प्राथमिक उपचार केले जात आहेत. केएमसी येथे आॅक्सिजनची व्यवस्था शनिवारपासून करण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. चौक ग्रामीण रुग्णालयात दहा बेड कोरोना रुग्णांसाठी असून, आॅक्सिजनची व्यवस्था असणार आहे, परंतु चौक परिसरातही रुग्ण आढळत असताना, जखमेवर फुंकर घालण्याचे काम आरोग्य यंत्रणा करत आहेत.

डॉक्टर, कर्मचाºयांची अपुरी संख्या

तालुक्यात खालापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून, वावोशी व लोहप, बोरगाव येथे उपकेंद्र आहे. ही सर्व जिल्हा परिषदेच्या अखत्यारित आहेत, तर चौक येथे ग्रामीण रुग्णालय असून, राज्यशासनाचे नियंत्रण आहे, परंतु सर्वच ठिकाणी डॉक्टर, कर्मचाºयांची अपुरी संख्या, अत्यावश्यक तपासणी यंत्रसामुग्रीची कमतरता, यामुळे रुग्णांची हेळसांङ सुरूच होती.

खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे सध्या नूतनीकरण करण्यात आले आहे. लाखो रुपये निधी खर्च करून रुग्णालय नव्या रूपात उभे राहिले असले, तरी एवढा खर्च करून रुग्णसेवा मात्र कनिष्ठ दर्जाची आहे. २०१५ मध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली होती त्यावेळी ग्रामस्थांच्या तक्रारींचा पाऊस पडला होता, परंतु आरोग्यसेवेत विशेष बदल घडलेला नाही.

तीन वर्षांत सहापेक्षा जास्त डॉक्टरांचे राजीनामे

वावोशी उपकेंद्रात डॉक्टरांअभावी ग्रामस्थांचा उद्रेकही झाला होता. त्यानंतर, तिथे डॉक्टरची नेमणूक करण्यात आली. आरोग्य केंद्रातील कर्मचाºयांसह सध्या सेवा देणारे कर्मचारीही कामाचे निश्चित तास नसल्याने वैतागले असून, खालापुरात तीन वर्षांत सहापेक्षा जास्त डॉक्टर नोकरीचा राजीनामा देऊन गेले आहेत. लोहोप येथे नवीन आरोग्य केंद्राचे काम तीन वर्षांपासून रखडले असून, ती इमारत तयार असती, तर कोरोना महामारीत आधार ठरली असती.

खालापूर तालुक्यात आतापर्यंत चारशेपेक्षा अधिक रुग्णसंख्या असून, सोळा जणांचा मृत्यू झाला आहे. ज्या तहसील कार्यालयातून प्रशासकीय उपचार करण्याचा कसातरी प्रयत्न केला जातो. त्या ठिकाणी कोरोनाचा प्रवेश झाल्याने ही यंत्रणा कुचकामी सिद्ध झाली आहे.
- अमोल गुरव, कोकण विभाग युवाध्यक्ष, अखिल गुरव समाज संघटना महाराष्ट्र

कोविड रुग्णालयासाठी तशा प्रकारची यंत्रणा हवी आहे. शंभर बेडसाठी पाच ते सहा डॉक्टर, स्टाफसह सर्व सामुग्री गरजेची आहे. तालुक्यात एकाच ठिकाणी असे रुग्णालय उभे राहणे आवश्यक आहे.
- डॉॅ. प्रसाद रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी, खालापूर

खालापूरला कोविड केंद्रासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. खालापूर नगरपंचायत आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने योग्य जागा शोधून, सध्या प्राथमिक अवस्थेत असलेला रुग्ण उपचारासाठी इंडिया बुल, तसेच पनवेलऐवजी खालापुरात राहिल, असे प्रयत्न आहेत.
- इरेश चप्पलवार, तहसीलदार, खालापूर

Web Title: Polkhol of Jhalikhalapur taluka health system due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.