वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल तालुक्यात शुक्रवारी १८६ जागांसाठी मतदान होणार आहे. २४ पैकी दोन बिनविरोध झाल्याने २२ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना राबवून या निवडणुका पार पडत आहेत. निवडणुकीत भाजप, सेना, कॉँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी ,मनसे आदी पक्षासह स्थानिक गावविकास आघाड्या रिंगणात उतरल्या आहेत.
वाढते शहरीकरण लक्षात घेता ग्रामपंचायतीमध्ये आपले वर्चस्व असावे या हेतूने मातब्बर मंडळी रिंगणात उतरली आहेत. याकरिता मतदारांना आमिषे दाखविण्याचे प्रकार सुरू आहेत.काही ग्रामस्थांनी गावातील वाद, तंटे मिटविण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला; मात्र अनेकांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीत उतरलेल्या ३९० जणांचे नशीब मतपेटीत आज बंदिस्त होणार आहे. चोख बंदोबस्तात ही निवडणूक पार पडत आहे.याकरिता सुमारे ७५० पोलीस बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत.
पोलीस बंदोबस्तग्रामपंचायत निवडणुकीत सर्व ९४ मतदार केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. याकरिता ७५० पोलीस नेमण्यात आले आहेत. पनवेलमध्ये संवेदनशील पाच गावे असून याठिकाणी पोलीस बंदोबस्तासह पेट्रोलिंगची गस्त वाढविण्यात येणार असल्याची माहिती परिमंडळ दोनचे उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे.
नियमांचे पालन करावेराज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार खबरदारी घेऊन मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. २२ ग्रामपंचायतीत १८६ जागांसाठी ही निवडणूक पार पाडली जाणार आहे.याकरिता प्रशासन सज्ज झाले आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर येताना मास्क घालावे तसेच सोशल डिस्टसिंगचे पालन करावे.- विजय तळेकर, निवडणूक निर्णय अधिकारी, पनवेल
थर्मल स्कॅनिंग करूनच प्रवेशकोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदार केंद्रावर आशासेविका उपस्थित राहणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व काळजी घेण्यात येणार आहे.
थर्मल स्कॅनिंग,सॅनिटायझर करूनच मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती तहसीलदार विजय तळेकर यांनी दिली.
निकाल १८ तारखेलाया ग्रामपंचायतीचा निकाल १८ तारखेला लागणार आहे. पनवेल शहरातील व्ही. के. हायस्कूलमध्ये मतमोजणी पार पडणार आहे.
पाच संवेदनशील गावे२२ ग्रामपंचायतींत पाच संवेदनशील गावे आहेत. येथे मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात इतर परिसरापेक्षा बंदोबस्त जास्त ठेवला गेला आहे.
५५,२७९एकूण मतदारस्त्री : २६०९१ पुरुष :२९२०५