कर्जत तालुक्यात निवडणुकींचे वेध
By admin | Published: January 9, 2017 06:27 AM2017-01-09T06:27:25+5:302017-01-09T06:27:25+5:30
राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी संपली. पाच राज्यांच्या निवडणुकासुद्धा जाहीर झाल्यात. कोणत्याही क्षणी महापालिका
विजय मांडे / कर्जत
राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी संपली. पाच राज्यांच्या निवडणुकासुद्धा जाहीर झाल्यात. कोणत्याही क्षणी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होतील. या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा निवडणुका म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. काही दिवसांपूर्वी जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुका ७ फेब्रुवारी रोजी होणार, असे मेसेज अगदी वर्तमानपत्रातील बातमीसह व्हायरल झाल्याने अनेक इच्छुकांनी आपापल्या प्रभागात मोर्चेबांधणीला सुरु वात केली. मात्र, अद्याप या निवडणुका जाहीर न झाल्याने, ही मोर्चेबांधणी थंडावली आहे. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस व शेकापची आघाडी निश्चितच आपले वर्चस्व राखेल, असे चित्र दिसत आहे.
कर्जत तालुक्यात गेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे पाच गट, तर पंचायत समितीचे दहा गण होते. यंदा त्यात बदल होऊन सहा गट व बारा गण झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या एका गटाची व पंचायत समितीच्या दोन गणांची वाढ झाल्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावणे, जरा सोपे झाले आहे. यावेळी तालुक्यात एके काळी निर्विवाद वर्चस्व असलेल्या शेतकरी कामगार पक्षाची व आता तालुक्यात वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झाली आहे. तर सध्या तरी शिवसेना, भाजपा व काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. आरपीआय कुणाबरोबर असेल, हे आताच सांगता येणार नाही.
प्रचाराच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. त्यांच्या जिल्हा परिषद गटनिहाय कार्यकर्त्यांच्या सभा वर्षाच्या पहिल्याच दिवशी पार पडल्या. इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारीचे अर्जसुद्धा दाखल केले; परंतु राष्ट्रवादी काँग्रेस-शेतकरी कामगार पक्षाची आघाडी असल्याने कोणत्या जागा कोणाला सोडायच्या याचा निर्णय न झाल्याने इच्छुक प्रतीक्षेत आहेत. असे असले तरी ज्यांना उमेदवारी मिळण्याची खात्री आहे ते प्रचारालासुद्धा लागले आहेत. अशी परिस्थिती शिवसेनेचीसुद्धा आहे. कोणाशी युती करायची हे अद्याप निश्चित न झाल्याने सर्वच प्रतीक्षेत आहेत. भाजपा, काँग्रेसनेसुद्धा उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्ष हे जिल्ह्यातील बलाढ्य दोन पक्ष एकत्र आल्याने त्यांना निवडणूक सोपी जाणार आहे. जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष ज्या पक्षाबरोबर आहे त्याची सरशी होते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. काही अपवादसुद्धा असतील; परंतु अलीकडच्या काळात हेच समीकरण दिसत आहे. खोपोली नगरपरिषदेत शेकापपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष झाला. जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, आरपीआय महायुती होती म्हणून आरपीआयचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला. त्यानंतर शेकापने महायुतीशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर घरोबा केल्याने जिल्हा परिषद अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळाले. तसेच कर्जत तालुक्यातसुद्धा शेतकरी कामगार पक्षाने शिवसेनेची साथ सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जुळवून घेतले म्हणून राष्ट्रवादीच्या सभापती विराजमान झाल्या. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आघाडी तालुक्यातील बहुतांश जागा जिंकेल, तर पंचायत समितीवरसुद्धा निर्विवाद सत्ता आणेल, असे चित्र आतातरी स्पष्टपणे दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप आघाडी जिंकण्याचे चिन्ह?
गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शेकापपक्ष, शिवसेना, आरपीआय अशी युती होती, तर कर्जत तालुक्यात ग्रामीण भागात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मते असलेल्या भाजपाला बरोबर घेऊन निवडणूक लढविलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या पाचपैकी दोन जागा जिंकल्या होत्या, तर पंचायत समितीच्या तीन जागा जिंकल्या होत्या, याचा फायदा भाजपाला मिळाला.कारण भाजपाचे प्रकाश वारे यांचा पं . स.मध्ये प्रवेश सुकर झाला होता.
अडीच वर्षांनंतर झालेल्या पंचायत स्ािमती सभापती निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून आघाडीचा धर्म तोडला व शिवसेनेबरोबर राहणे पसंद केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला उपसभापतीपदावर पाणी सोडावे लागले होते. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आघाडी तालुक्यातील बहुतांश जागा जिंकेल, तर पंचायत समितीवरसुद्धा निर्विवाद सत्ता आणेल, असे चित्र आतातरी स्पष्टपणे दिसत
आहे.