नवीन उद्योगांना प्रदूषण मंडळाचा हिरवा कंदील
By Admin | Published: June 23, 2017 06:05 AM2017-06-23T06:05:44+5:302017-06-23T06:05:44+5:30
पूर्वी डर्टीथर्टीच्या काळ्या यादीत बदनाम झालेल्या महाड औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी केंद्राने केलेल्या आमूलाग्र बदलांमुळे
लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : पूर्वी डर्टीथर्टीच्या काळ्या यादीत बदनाम झालेल्या महाड औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी केंद्राने केलेल्या आमूलाग्र बदलांमुळे, तसेच राबवलेल्या कठोर निर्बंधांमुळेच हे सामूहिक सांडपाणी केंद्र महाराष्ट्रात सर्वोत्तम ठरले. त्यांचा आदर्श महाराष्ट्रामधील अन्य सांडपाणी प्रक्रिया केंद्रानेही घ्यावा, असे आवाहन करताना, भविष्यात महाडचे हे सांडपाणी प्रक्रिया केंद्र राष्ट्रीय पातळीवरही आपल्या गुणवत्तेबाबत नावलौकिक मिळवेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. ए. एन. हर्षवर्धन यांनी केले.
महाडच्या सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला ‘वसुंधरा पुरस्कार’ मिळाल्याबद्दल एमएसए सीईटीपीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी नव्याने सुशोभीकरण करण्यात आलेल्या गार्डन व वातानुकूलित कॉन्फरन्स हॉलचेही डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
सांडपाणी केंद्राचा परफार्मन्स उत्कृष्ट असल्यामुळे नवीन रासायनिक कारखान्यासाठी महाड औद्योगिक क्षेत्रात हिरवा कंदील असेल, अशा उद्योगांना प्रदूषण मंडळाकडून कुठलीही अडचण निर्माण होणार नाही, अशी ग्वाहीदेखील डॉ. हर्षवर्धन यांनी या वेळी दिली. आम्ही ज्या ज्या औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राना भेटी देतो, त्या वेळी त्या ठिकाणच्या संचालकांना महाडचे प्रक्रिया केंद्र बघून यात त्यांनी कशा सुधारणा केल्या, त्याचे निरीक्षण करा, असा सल्ला आम्ही देत असतो. सामाजिक जबाबदारीची जाणीव असल्यामुळेच महाड औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणमुक्त वातावरण उद्योगांनी निर्माण केल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले. प्रक्रिया केंद्राचे अध्यक्ष संभाजीराव पठारे आणि सहकाऱ्यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नांमुळेच या प्रक्रिया केंद्राला वसुंधरा पुरस्कार मिळाल्याचे सांगताना, प्रदूषणमुक्त वातावरण असेल तर निसर्गदेखील चांगली साथ देत असतो. महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांना सर्व प्रकारचे सहकार्य प्रदूषण मंडळाकडून केले जाईल, असेही हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले. प्रदूषण मंडळाचे वरिष्ठ अधिकार सोनटक्के यांनी महाडमधील उद्योगांनी अनेक अडचणींवर मात करीत आपला विकास साधला आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्याचे काम कारखानदारांनी करण्याची आवश्यकता आहे.
प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत, महाडच्या सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राने केलेली प्रगती कौतुकास्पद असल्याचेही सोनटक्के यांनी सांगितले. एमएमए सीईटीपीचे अध्यक्ष संभाजीराव पठारे म्हणाले की, आपल्या केंद्राला वसुंधरा पुरस्कार मिळाल्यामुळे येथील प्रत्येक उद्योगाची जबाबदारी आता वाढलेली असल्याचे सांगितले. प्रक्रिया केंद्राच्या सुधारणेसाठी आपण घेतलेल्या कठोर निर्णयामुळे कटुता निर्माण झाली होती. मात्र, त्यापेक्षा आज त्याची खऱ्या अर्थाने फ लश्रुती झाल्याचे समाधान लाभल्याचे पठारे यांनी सांगितले. त्यासाठी अनेक सकारात्मक निर्णय घेतले म्हणूनच हा नावलौकिक मिळाल्याचे पठारे यांनी स्पष्ट केले. या वेळी पर्यावरणतज्ज्ञ डॉ. सुधीर पटवर्धन, रमेश भोसले, जे. एच. पाटील, कार्यकारी अभियंता बाळासाहेब झंजे यांची भाषणे झाली. व्यासपीठावर उपाध्यक्ष अशोक तलाठी, के. व्ही. आपटे, पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, उपप्रादेशिक अधिकारी माने आदी उपस्थित होते.