- सिकंदर अनवारे दासगाव : महाड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रामुळे शेतकऱ्यांची मोठी हानी होत असताना दिसून येत आहे. जल प्रदूषण आणि वायुप्रदूषणामुळे सध्याच्या परिस्थितीत शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. हजारो हेक्टर शेती नापीक झाली आहे. तसेच हजारो आंबा बागायतदारांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून आहे ते मोठ्या संकटात सापडले आहेत. औद्योगिक क्षेत्रामुळे महाड तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास होईल, असे वाटत असताना मात्र औद्योगिक क्षेत्राने महाड तालुक्यातील शेतकºयांना अडचणीत आणले आहे. वेळोवेळी औद्योगिक क्षेत्राच्या जल आणि वायुप्रदूषणाने होणारे शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामेदेखील अनेक वेळा करण्यात आले. मात्र, संकटात सापडलेल्या शेतकºयाला एक रुपयादेखील मदत आजतागायत मिळाली नाही. यामुळे शेतकºयांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
महाड औद्योगिक क्षेत्रात बहुतांश कंपन्या या रासायनिक उत्पादन निर्मिती करणाºया आहेत. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून एमआयडीसीमधील जल आणि जमीन प्रदूषण कायम वादाचा विषय बनला आहे. याबाबत अनेक कंपन्यांना बंदच्या नोटिसाही देण्यात आल्या आहेत. महाडमधील रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी मुळातच आंबेत खाडीत सोडण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, हे पाणी सुरुवातीला सव आणि त्यानंतर ओवळे गावाजवळ सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे महाड खाडीपट्टा आणि बिरवाडी परिसरातील गावातील जमीन आणि पिण्याचे पाणी प्रदूषित झाले आहे.
एकेकाळी जागतिक यादीच्या डर्टी-थर्टीमध्ये महाड औद्योगिक क्षेत्राचा समवेश झाला होता. त्यानंतर बरेच बदल करून हे नाव आता वगळण्यात आले असले तरी आजही अनेक कारखाने आपले पाणी ऐन पावसाळ्यात सोडून देण्यात मागेपुढे पाहत नाहीत. जलप्रदूषण आणि जमीन प्रदूषण याकडे पाहताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मात्र हवाप्रदूषणाकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे महाड तालुक्यातील विशेषत: खाडीपट्टा विभागातील भातशेती रासायनिक पाण्यामुळे नापीक झाली आहे. यामध्ये दादली, सव, गोठे, रावढल, तुडील, तेलंगे, चिंभावे, गोमेंडी, टोळ, सापे, दासगाव, वहूर, केंबुर्ली या गावांचा समावेश आहे.
भातपिकाबरोबर या विभागात कडधान्यदेखील मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. मात्र, भरतीच्या वेळेस रासायनिक सांडपाणी या शेतीत शिरत असल्याने नुकसान झाले आहे. यामुळे जमिनीचा कस कमी होऊन नुकसान झाले आहे.
आंबा उत्पादनाला फटका
महाड तालुक्यात असलेला आंबा व्यवसायदेखील यामुळे धोक्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी आंबा उत्पादक मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादन घेत होते. मात्र, आता हे उत्पादन कमी झाले असून आंबा उत्पन्न घटले आहे.
महाडमध्ये ७५० हेक्टरवर तीन हजार शेतकºयांची एक लाख कलमांची झाडे आहेत. दहा-बारा वर्षांपूर्वी याच झाडांपासून शेतकरी लाखो रुपये उत्पन्न घेत होते.वायू आणि जलप्रदूषणामुळे हे पीक निम्म्यापेक्षा कमी मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ज्यांचा उदरनिर्वाह आंबा पिकाच्या उत्पन्नावरच होता. असे शेतकरी संकटात आहेत.
रासायनांमुळे जमिनी प्रदूषित झाल्या असून जमिनीचा पोत खराब होऊन दिवसेंदिवस त्या नापीक झाल्या आहेत. यातून उत्पादित होणारे धान्य, भाजीपाला, कडधान्य आणि फळे माणसाच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकतात.- एम. आर. बरकडे, कृषी सहायक,
महाड१३०० हेक्टर जमीन पडीक
महाड तालुक्यात १३ हजार ६०० हेक्टर लागवड जमीन आहे. यामध्ये ३२ हजार शेतकरी आहेत. सध्या १३०० हेक्टर ही महाड तालुक्यातील पडीक जमीन झाली आहे. यामध्ये निम्मी जमीन ही औद्योगिक क्षेत्राच्या जलप्रदूषणामुळे नापीक झाली आहे. ज्या शेतीतून हजारो क्विंटल भात आणि शेकडो क्विंटल कडधान्य जो शेतकरी घेत होता या औद्योगिक क्षेत्रामुळे नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकºयांना आपल्या जमिनी ओसाड ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही. प्रशासन मात्र या शेतकºयांकडे दुर्लक्ष करत आहे. अशा अवस्थेत शेतकºयाला हात पसरण्याची पाळी आली आहे.