तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात
By वैभव गायकर | Published: December 20, 2023 09:01 PM2023-12-20T21:01:40+5:302023-12-20T21:02:14+5:30
दुषित वायू सोडणाऱ्या कारखान्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी
वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखान्यांतून होणाऱ्या रासायनिक वायू प्रदूषणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे शासनाचे लक्ष वेधले. तसेच दुषित वायु सोडणाऱ्या कारखान्यांवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचनेत म्हंटले आहे.
औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांमार्फत रात्री अपरात्री तसेच पहाटेच्या वेळीत सोडण्यात येणाऱ्या रासायनिक दुषित वायुमुळे पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठे, खारघर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याचे निदर्शनास आले असल्याची बाब आमदार ठाकुर यांनी सभागृहात मांडली.त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या या औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांवर कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांच्या मनात संबंधित विभागाबाबत चिड निर्माण झाली असून या औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील खारघर, कळंबोली, तळोजा आणि पनवेल परिसरातील अनेक नागरिक आपली घरे सोडून अन्यत्र स्थलांतर होत असून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची सदर प्रदुषण करणाऱ्या कारखान्यांच्या बरोबर साटेलोट असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे दुषित वायु सोडणाऱ्या कारखान्यांवर तसेच या परिसरातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची नितांत गरज असून याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही व उपाययोजना करावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदूषणाच्या लक्षवेधीवर उत्तर देताना म्हटले आहे कि ;हिवाळ्यात रात्रीच्यावेळी तापमानात होणारी घट यामुळे उत्सर्जित वायुंचे विसर्जन होण्यास अडथळा निर्माण होत असल्याने नजीकच्या परिसरात रासायनिक वास पहाटेच्यावेळी काहीवेळा जाणवल्याचे या कार्यालयाच्या रात्रीच्या गस्ती दरम्यान निदर्शनास आले आहे. तक्रारीच्या अनुषंगाने सेंट्रलपार्क सेक्टर-२१, खारघर येथे मोबाईल एअर मॉनिटरींग व्हॅन व्दारे हवेची गुणवत्ता मोजण्याचे काम ०६ डिसेंबर पासून ते आजपर्यंत चालू आहे, या अहवालावरून हवेच्या गुणवत्तेमध्ये केमिकल घटकांचे प्रमाण विहित मर्यादेत असल्याचे तसेच हवा गुणवत्ता निर्देशांक हा "मध्यम" स्वरुपाचे असल्याचे निदर्शनास आले असल्याचे आपल्या उत्तरात म्हटले आहे.
लहान मुलांच्या वाढीवर परिणाम नाही
पनवेल महानगरपालिका व तसेच वैद्यकीय अधिक्षक उप जिल्हा रुग्णालय, पनवेल यांच्याकडून नजीकच्या रहिवाश्यांच्या आरोग्यावर झालेल्या परिणामाबाबतचा अहवाल मागविला होता. त्यांच्या अहवालानुसार तळोजा औद्योगिक वसाहतीतून निर्माण होणारे वायू व जल प्रदुषणामुळे सभोवतालच्या परिसरातील रहिवासी संकुल क्षेत्रातील लहान मुले प्रदुषणामुळे मृत होणे, लहान मुलांच्या वाढीवर परिणाम होणे या बाबतची नोंद रुग्णालयातील अहवालानुसार दिसून येत नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.