समस्यांमुळे माणगावकर हैराण, सांडपाण्यामुळे काळनदी होतेय प्रदूषित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 03:01 AM2019-02-07T03:01:56+5:302019-02-07T03:02:17+5:30
नगरपंचायतीस तीन वर्षे पूर्ण होत असताना नगरपंचायतीपुढे कचऱ्याचा मोठा यक्षप्रश्न उभा आहे. योग्य डम्पिंग ग्राउंड नसल्याने कच-याची विल्हेवाट लावता येत नाही, तसेच माणगाव शहराचे शहरीकरण झपाट्याने होत असल्याने मानवी वस्ती वाढत आहे.
- गिरीश गोरेगावकर
माणगाव - नगरपंचायतीस तीन वर्षे पूर्ण होत असताना नगरपंचायतीपुढे कचऱ्याचा मोठा यक्षप्रश्न उभा आहे. योग्य डम्पिंग ग्राउंड नसल्याने कच-याची विल्हेवाट लावता येत नाही, तसेच माणगाव शहराचे शहरीकरण झपाट्याने होत असल्याने मानवी वस्ती वाढत आहे. त्यामुळे सांडपाण्याचे योग्य नियोजन नसल्याने काळ नदी लागत असणाºया वस्तीचे सांडपाणी नदीपात्रात जावून प्रदूषण वाढत आहे.
माणगाव नगरपंचायत झाली त्यामध्ये खादाड, नाणोरे, उतेखोल ही माणगाव लागत असणारी गावे जोडली गेली. आता नगरपंचायत झाल्यामुळे माणगावच्या विकासाला आता गती येईल, असे माणगावकरांना वाटले होते; परंतु असे काहीही झालेले नाही. ज्या प्राथमिक समस्या माणगावमध्ये होत्या त्या तशाच गेल्या दोन वर्षे राहिल्या. गेल्या वर्षात माणगावमध्ये प्रमुख रस्ता मानला जाणारा कचेरी रोड, दुतर्फा काँक्रीट गटारे महामार्गावरील काँक्रीट गटारे, वैयक्तिक शौचालये, गणपती विसर्जन घाट हे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागले असून, अंतर्गत रस्त्यांची कामे व गटारे अजून शिल्लक आहेत. जुन्या माणगावमध्ये पाण्याची अनियमितता आहे. पाणी वेळेवर येत नाही आणि आले तरी कधी जास्त वेळ असते तर कधी अतिशय कमी वेळ, त्यामुळे नागरिकांचे हाल होतात.
ग्रामपंचायत कालखंडामध्ये अनधिकृत बांधकामांना दिलेल्या संमतीमुळे आज सांडपाण्याची समस्या भेडसावत आहे. ग्रामपंचायत कालावधीत सदनिकांना सांडपाण्याचे नियोजन नसताना सदनिका काळ नदीकिनारी बांधल्या गेल्या, त्यामुळे सांडपाणी जाण्यास मार्ग नसल्याने पाणी नदीत जात आहे. यावर मार्ग काढण्यास नगरपंचायत माणगावची कसोटी लागणार आहे.
माणगावमधील अनेक निवासी संकुल गृहप्रकल्पांचे सांडपाणी थेट काळनदीत सोडले आहे. या काळनदीचे पाणी शहरातील ग्रामस्थांबरोबरच तालुक्यातील सुमारे शंभर ते सव्वाशे गावांतील नागरिकांना पुरविले जाते. सद्यपरिस्थितीत हे पाणी अत्यंत दूषित झाले असून, साथीचे अनेक रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. याच नदीवर पुढे गोरेगावचे धरण आहे. या सर्व गोष्टींकडे नगरपंचायत पूर्णपणे डोळेझाक करीत आहे.
कचरा उचलण्याचा प्रश्न मार्गी लागला असून, कचºयावर तांत्रिकदृष्ट्या विघटन करण्यासाठी डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था दत्तनगर येथे लवकरच करण्यात येणार असून त्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांच्या परवानगीने घेऊन हा कचराप्रश्न काही दिवसांतच मार्गी लागणार आहे.
- योगिता चव्हाण,
नगराध्यक्षा, माणगाव नगरपंचायत
माणगाव शहरात झपाट्याने शहरीकरण होत आहे, यामुळे सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरिता भूमिगत गटारांचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. माणगाव शहरातील अनेक समस्या मार्गी लावल्या आहेत, यात मुख्य कचेरी रस्ता, शहरातील मुख्य गटारांचे काँक्र ीटीकरण, अंतर्गत रस्ते झाले असून कालवा रोडचे नूतनीकरण, पाण्याच्या नवीन टाक्या ही मंजूर कामे चालू होणार आहेत, तरी माणगाव शहर विकासकामात कात टाकत चालले आहे.
- समीर जाधव,
मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपंचायत माणगाव