बिरवाडी : महाड एमआयडीसीमध्ये प्रदूषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. २२ मार्च रोजी दु. ४ वा. सानिका केमिकलमधील घातक रसायन थेट औद्योगिक वसाहतीमधील नाल्यात सोडले असल्याचे दिसून आल्याने महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या महाड उपप्रादेशिक कार्यालयाने पाण्याचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविले आहेत.गेल्या वर्षभरात प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाड औद्योगिक वसाहतीमधील १४ कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस, तर दोन कारखान्यांना बंदची नोटीस दिली असतानादेखील सी झोनमध्ये येणाऱ्या सानिका केमिकल्स प्रा. लि. या कारखान्याचे घातक रसायन थेट औद्योगिक वसाहतीमधील नाल्यामध्ये आढळून आल्याने स्थानिकांनी या घटनेची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला कळविल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी दिनेश व्ही. वसावा यांनी सानिका केमिकलनजीक असणाऱ्या नाल्यातून रसायनमिश्रित पाण्याचे नमुने ताब्यात घेऊन ते चिपळूण येथील प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले आहेत. या रसायनमिश्रित पाण्याचा पीएच दोन- तीन एवढा आढळून आला आहे. आढळून आलेल्या पीएचचे प्रमाण हे अधिक असल्याने या प्रकरणी सानिका केमिकल्स प्रा. लि. कंपनीला नोटीस (वॉर्निंग नोटीस) बजाविण्यात आली असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी दिनेश वसावा यांनी प्रत्यक्ष भेटीअंती दिली आहे.सानिका केमिकल कंपनीमध्ये इटीपी प्लांटशेजारील भिंतीमधून रसायनमिश्रित सांडपाणी औद्योगिक वसाहतीमधील नाल्यामध्ये आल्याचे देखील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्र अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता सानिका केमिकल्सचे व्यवस्थापक शेखर ठाकूर यांच्याशी संपर्कसाधला असता कारखान्यातील इटीपी यंत्रणा मे महिन्यात काम बंद ठेवून सुधारित करणार असल्याचे सांगत नेमकी गळती कोणत्या ठिकाणी आहे याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
महाड एमआयडीसीत प्रदूषण
By admin | Published: March 23, 2017 1:35 AM