उरण परिसरातील प्रदूषणाची समस्या गंभीर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 01:00 AM2020-12-20T01:00:13+5:302020-12-20T01:00:41+5:30

Uran : विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात समुद्र, खाड्या किनारी आणि मोकळ्या परिसरात झालेल्या प्रचंड दगड-मातीच्या भरावामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी झाली आहे.

Pollution problem in Uran area is serious, neglected by Maharashtra Pollution Control Department | उरण परिसरातील प्रदूषणाची समस्या गंभीर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष 

उरण परिसरातील प्रदूषणाची समस्या गंभीर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष 

googlenewsNext

उरण : उरण परिसरातील वाढते औद्योगिकीकरण, प्रचंड प्रमाणात होत असलेले मातीचे भराव, मॅन्ग्रोव्हजची होणारी प्रचंड वृक्षतोड, उरण-पनवेल मार्गावरील डोंगर कपारीत चालणाऱ्या धूळ फेकणाऱ्या दगडखाणी आणि रासायनिक घातक प्रकल्पांमुळे येथील पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला आहे. मात्र त्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
उरण परिसरात प्रचंड औद्योगिकीकरण सुरू आहे. अत्याधुनिक जेएनपीटी, इतर खासगी बंदरांमुळे विविध प्रकारच्या कंपन्या, रासायनिक प्रकल्प, कंटेनर व इतर माल साठवणुकीची शेकडो गोदामे उभारण्यात आली आहेत. विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात समुद्र, खाड्या किनारी आणि मोकळ्या परिसरात झालेल्या प्रचंड दगड-मातीच्या भरावामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी झाली आहे. समुद्र, खाड्या, जलाशयांत झालेल्या प्रचंंड दगड-मातीच्या भरावामुळे समुद्राची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने गावांसभोवार असलेले बांध-बंदिस्ती उद्ध्वस्त करून समुद्राचे पाणी गावागावात शिरू लागले आहे.
नवी मुंबई सेझ, जेएनपीटी सेझ प्रकल्पांसाठी झालेल्या भरावामुळे तर गावांपासून समुद्र, खाड्यांपर्यत पावसाळी पाण्याचा निचरा करणारे नैसर्गिक नाले बुजले गेले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचून नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय परिसरातील प्रचंड दगड-मातीच्या भरावामुळे स्थलांतरित आणि विविध स्थानिक जलचर पक्ष्यांची वास्तव्याची ठिकाणे नष्ट झाली आहेत. भरावासाठी डोंगर, टेकड्या भुईसपाट करण्यात आल्या आहेत. यामुळे परिसरातील पशू-पक्ष्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. 
परिसरात उभारण्यात आलेल्या धोकादायक तसेच अत्यंत ज्वालाग्राही रासायनिक प्रकल्पांमुळे रासायनिक दूषित पाणी समुद्रात आणि खाड्यांत मिसळत आहे. त्यावर पर्यावरण खात्याचे फारसे नियंत्रणच नसल्याने जल, वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

पारंपरिक मासेमारीही आली धोक्यात 
वाढत्या जलप्रदूषणामुळे पारंपरिक मासेमारीही धोक्यात आली आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकल्पांच्या उभारणीसाठी दुर्मीळ मॅन्ग्रोव्हज झाडांची बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे. उरण-पनवेल मार्गावरील डोंगर कपारीत चालणाऱ्या धूळ फेकणाऱ्या दगडखाणी आणि क्वाऱ्या दिवसरात्र सुरू आहेत. यामुळे हवेत उडणाऱ्या धुरळ्याने परिसर व्यापून जात आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविणेही कठीण होते. नाकातोंडात धूळ जात असल्याने आरोग्याशी खेळ सुरू आहे.

Web Title: Pollution problem in Uran area is serious, neglected by Maharashtra Pollution Control Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.