- सिकंदर अनवारेदासगाव : महाड एमआयडीसीमधील प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महाड प्रदूषण नियंत्रण मंडळ पोकळ कारवाई करत असल्याने औद्योगिक क्षेत्रातील नाले रंगीत झाले आहेत. जिते गावापासून वाहत येणारा टेमघर नाला गेल्या काही दिवसांपासून दूषित झाला असून, या पाण्यामध्ये रासायनिक सांडपाणी मिसळत आहे. महाड औद्योगिक क्षेत्रातील सी, ई, बी, के, या झोनमधील नाल्यांमधूनही हीच अवस्था दिसून येत आहे. शिवाय, कंपन्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषणही होत आहे. या वायुप्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.महाड औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कंपन्यांमुळे परिसरातील नाले प्रदूषित झालेच. शिवाय, ज्या ठिकाणी हे सांडपाणी खाडीत सोडले जाते, त्या खाडीच्या परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोतही प्रदूषित झाले. यामुळे या ठिकाणी सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात आले आहे. शिवाय महाड मॅन्युफॅक्चर असोसिएशनने प्रदूषणावर काम करण्यास सुरुवात केली. मात्र, अनेक छोटे-मोठे कारखाने नियम धाब्यावर बसवत नाल्यात पाणी सोडण्याचे काम करत आहेत. यामुळे एमआयडीसीमधील नाले कायम दूषित होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. महाड औद्योगिक क्षेत्रात पक्की गटार व्यवस्था नसल्याने याचा फायदा कारखानदार घेत असल्याने नाल्यातील पाणी रंगीत झाले आहे. हे रासायनिक पाणी मिसळत असल्याने नदीदेखील प्रदूषित होत आहे. हेच पाणी पिण्याकरिता उचलले जात आहे.महाडमधील टेमघर नालादेखील काही दिवसांपासून प्रदूषित झाला असल्याचे दिसून येत आहे. देशमुख-कांबळे येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या या नाल्यावर पांढरा रंगाचा थर जमा झाला होता. दोन दिवसांपूर्वी टेमघर ते हायकल कंपनीपर्यंत साचलेल्या पाण्यात माशांची लहान पिले मृत झाल्याचे आढळून आले होते. हा नाला थेट सावित्री नदीला जाऊन मिळत आहे. ज्या ठिकाणी महाड एमआयडीसी पिण्याकरिता पाणी पम्पिंग करते, त्याच ठिकाणी हे पाणी येऊन मिळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी सन २०१८ मध्येही हा नाला प्रदूषित झाला होता. यामुळे मासे मृत पावले होते. पुन्हा अशीच स्थिती झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.मात्र, याकडे महाड औद्योगिक प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. कंपन्यांना नोटिसा देणे, या व्यतरिक्त काम होत नसल्याने औद्योगिक क्षेत्रातील नाले पाऊस नसतानाही पाण्याने भरलेले दिसून येत आहेत.कारवाईसाठी पाठवले प्रस्तावमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने गेल्या काही वर्षात प्रदूषित कंपन्यांवर कारवाई करावी, यासाठी प्रादेशिक कार्यालयाला प्रस्ताव पाठवले आहेत. मात्र, या प्रस्तावावर कारवाई होत नसल्याने कंपन्या निर्धास्त झाल्या आहेत. प्रादेशिक कार्यालयाकडूनही केवळ नोटिसा देण्याचे काम केले जात आहे.महाड उपप्रादेशिक कार्यालयाने १ जुलै २०१७ ते २८ फेब्रुवारी२०१९ या कालावधीत प्रादेशिक कार्यालयाला जवळपास ४८ प्रस्ताव पाठवले. यामध्ये महाड नगरपरिषद, महाड सीईटीपी, एमआयडीसी यांच्यासह नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. या प्रस्तावावर अद्याप कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही.महाड एमआयडीसीमध्ये वायू आणि जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. गेली अनेक वर्षे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी करून ठोस कारवाई केली जात नाही. सध्या जिते गावामध्ये लहान-मोठ्यांना दम्याचा आजार मोठ्या प्रमाणात उद्भवला आहे. प्रदूषणामुळे हे आजार झाल्याची शक्यता डॉक्टरांनीही वर्तविली आहे. यामुळे प्रदूषणकारी कारखान्यांवर ठोस कारवाई होणे गरजेचे आहे.- एजाज दरेखान,माजी सरपंच, जिते ग्रुप ग्रामपंचायत१९८० पासून या ठिकाणी कारखाने आहेत. आरोग्याचा विषय असो किंवा शेती प्रदूषणासंदर्भात या ठिकाणी कोणताच सर्व्हे झालेला नाही. संपूर्ण परिसरात प्रदूषणामुळे घरोघरी अनेक आजार उत्पन्न झाले आहेत. अनेक कारखान्यांना या ठिकाणी झिरो डिस्चार्जची परवानगी असल्याने वेस्ट पाणी रात्री नदीमध्ये सोडण्याचे प्रकार सुरू आहेत. महाड प्रदूषण मंडळाकडे कोणतीही प्रदूषणासंदर्भात तक्रार केली तर वरच्या कार्यालयात अहवाल पाठवल्याचे उत्तर देऊन टाळाटाळ करतात. नेहमी आपली जबाबदारी झटकण्याचे काम करतात.- निजाम जलाल, ग्रामस्थ, टोळमहाड खाडीपट्ट्यामध्ये गेली अनेक वर्षे महाड एमआयडीसीकडून प्रदूषित सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे खाडीपट्ट्यातील नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार प्रदूषित पाणी सोडल्याने दमा, कॅन्सर अशा भयानक आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा एमआयडीसीकडे तक्रार करूनही मोर्चे आणि आंदोलन करूनसुद्धा कोणतीच दखल न घेता मार्ग काढण्यास असफल राहिले आहेत. एमआयडीसीचे अधिकारी सहकार्य करण्यास तयार नाहीत.- राजेंद्र मांजरेकर,ग्रामस्थ, गोठे
प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, औद्योगिक क्षेत्रातील नाले रंगीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 2:56 AM