नेरुळ - उरण रेल्वे प्रकल्पाच्या उद्घाटनाला पीओएम कार्यालयाचा अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 03:06 PM2023-09-01T15:06:43+5:302023-09-01T15:07:10+5:30

ग्रीन सिग्नल मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळेच प्रवासी वाहतूक रखडली

POM office obstructs inauguration of Nerul-Uran railway project | नेरुळ - उरण रेल्वे प्रकल्पाच्या उद्घाटनाला पीओएम कार्यालयाचा अडथळा

नेरुळ - उरण रेल्वे प्रकल्पाच्या उद्घाटनाला पीओएम कार्यालयाचा अडथळा

googlenewsNext

मधुकर ठाकूर, उरण : खारकोपर- उरण दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यातील अपुर्ण अवस्थेत असलेली काही कामे आणि पीओएम कार्यालयाकडून ग्रीन सिग्नल मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळेच बहुचर्चित उरण -नेरुळ रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन रखडले असल्याची माहिती समोर आली आहे.

उरण- नेरुळ रेल्वे मार्गावरील पहिला टप्पा पुर्ण झाल्यानंतर या नेरुळ- खारकोपरपर्यत प्रवासी वाहतूक तीन वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील खारकोपर ते उरण या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी  रेल्वे प्रशासनाकडून अनेक हेडलाईन्सही जाहीर करण्यात आल्या होत्या. पंतप्रधानांच्या हस्ते सीएसएमटी ते उरण प्रवासी वाहतूकीला ग्रीन सिग्नल देण्याची तयारीही रेल्वे प्रशासनाने सुरू केली होती.मात्र रेल्वे प्रशासनाने वारंवार जाहीर केलेल्या हेडलाईन्स हवेतच विरल्या आहेत. त्यानंतर खारकोपर ते उरण या मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरू होण्यापूर्वीच उरण स्थानकातील पादचारी भुयारी मार्गच पहिल्या पावसातच जलमय झाल्याने निकृष्ट कामाची चांगलीच पोलखोल झाली.  भुयारी मार्गच स्विमिंग पुल झाल्याची घटना विविध वृत्तपत्रे, वृत्त वाहिन्यांवर अवघ्या देशाने पाहिली.या घटनेची पीएमओ कार्यालयानेही गंभीरपणे दखल घेतली आहे.

त्यानंतरही रेल्वे प्रशासन, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदी आदी लोकप्रतिनिधींकडून कडून खारकोपर ते उरण या मार्गावरील दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच करून रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.मात्र दुसऱ्या टप्प्यातील अपुर्ण अवस्थेत असलेली काही कामे आणि पीओएम कार्यालयाकडून ग्रीन सिग्नल मिळणे अद्याप बाकी असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. मात्र या रेल्वे मार्गावरून शक्य तितक्या लवकर प्रवासी वाहतूक सुरू व्हावी आणि या रेल्वे मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच उद्घाटन करण्यात यावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही बारणे यांनी सांगितले.

 

Web Title: POM office obstructs inauguration of Nerul-Uran railway project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे