लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : तालुक्यातील मांघरूण- पंदेरी-दापोली मार्गावर असलेला पूल गेल्या तीन दिवसांपासून पाण्याखाली असल्याने पंदेरी आणि दापोली या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. या दोन्ही गावांतील नागरिक आणि विद्यार्थी गावातच अडकून पडले आहेत.या पुलाची उंची कमी असल्याने थोडा पाऊस झाला तरी या पुलावरून पाणी जात असते. गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे या पुलावरून पाणी वाहात असून, त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद झाला आहे. पुलानजीक रस्त्यावर एक मोठा खड्डा पडल्याने या मार्गावरील एस.टी. फेरी आधीच बंद करण्यात आलेली आहे. या परिस्थितीमुळे या गावाचा महाडशी असलेला संपर्क तुटला आहे. सोमवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांमध्ये १२१ मि.मी. पावसाची नोंद झाली. महाड-रायगड मार्गावरील नाते गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जुन्या पुलावरूनही पुराचे पाणी वाहत आहे.
पंदेरी, दापोलीचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 2:33 AM