पंदेरी-दापोली गावांना जोडणारा पूल चार दिवस पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 11:13 PM2019-07-10T23:13:12+5:302019-07-10T23:13:22+5:30
लोखंडी पुलाचा आधार : विद्यार्थ्यांना करावी लागते पायपीट
बिरवाडी : महाड तालुक्यातील दापोली-पंदेरी गावांना जोडणारा पूल गेले चार दिवस पडणाऱ्या पावसाने पाण्याखाली गेला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत व महाविद्यालयात जाण्यासाठी चार किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे, तर नदीपात्र ओलांडण्याकरिता लोखंडी पुलाचा आधार घेत तारेवरची कसरत करीत ये-जा करावी लागत आहे.
महाड शहरापासून २५ ते ३० किलोमीटरच्या अंतरावर पंदेरी, दापोली, दापोली पाडा, ही गावे सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेली आहेत. या ठिकाणी जाण्याकरिता असणाºया रस्त्यावर नदीपात्र ओलांडण्याकरिता पूल बांधण्यात आला आहे. मात्र, पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्याच्या दिवसांत अनेक दिवस गावांचा तालुक्यापासून संपर्क तुटला जात आहे. दापोली-पंदेरी या गावाकडे जाणाºया रस्त्याचे नूतनीकरण प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे सद्यस्थितीत रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून या रस्त्याचे डांबरीकरणही झाले आहे. मात्र, या रस्त्यावरील पुलाची उंची कमी असल्याने हा पूल मुसळधार पावसात कायम पाण्याखाली असल्याने गावातील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते, तर विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता पंदेरी-दापोली, दापोली-पाडा अशी पायपीट करीत वाळण कोंडी येथील लोखंडी पुलावरून नदी ओलांडावी लागते, ही परिस्थिती कायम असल्याने शासनाच्या उदासीन धोरणामुळे या डोंगरावरील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
याबाबत महाडचे आमदार भरत गोगावले यांनी ही समस्या मार्गी लावण्याकरिता सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे, याकरिता शासन दरबारी पाठपुरावा करून दापोली-पंदेरीमधील नागरिकांची गैरसोय कायमस्वरूपी दूर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.