कर्जत तालुक्यातील पूल धोकादायक
By Admin | Published: July 16, 2017 02:51 AM2017-07-16T02:51:28+5:302017-07-16T02:51:28+5:30
कर्जत तालुक्यातील अनेक छोट्या-मोठ्या पुलांची अवस्था धोकादायक असून, पुलांचे संरक्षक कठडे अनेक वर्षांपासून तुटलेले आहेत. काही पुलांवरील रेलिंग गायब झाली आहेत.
- कांता हाबळे । लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : कर्जत तालुक्यातील अनेक छोट्या-मोठ्या पुलांची अवस्था धोकादायक असून, पुलांचे संरक्षक कठडे अनेक वर्षांपासून तुटलेले आहेत. काही पुलांवरील रेलिंग गायब झाली आहेत. तर काही पुलांवर अद्याप संरक्षक कठडेच नसल्याने अपघाताची दाट शक्यता आहे; परंतु याकडे लक्ष देण्यास बांधकाम विभागाला वेळ मिळत नसल्याने अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न चालक व प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
तालुक्यातील काही पूल हे सार्वजनिक बांधकाम खाते व काही पूल हे जिल्हा परिषद बांधकाम खात्यांतर्गत येतात. या पुलांकडे ना सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष, ना जिल्हा परिषद बांधकाम खात्याचे, त्यामुळे पुलांची दुर्दशा झाली आहे. तालुक्यातील पोशीर नदीवरील माले पूल, सालोख, वारे-कुरुंग रस्त्यावरील पूल, दहीवली पूल, मिरचोली पूल, मोहिली पूल, तलवडे पूल, अशा अनेक पुलांवरील संरक्षक कठडे व रेलिंग गायब आहेत. तर अनेक छोट्या-मोठ्या पुलांवर अद्याप संरक्षक कठडे बसवण्यात आलेले नाहीत. पुलावरील रस्तेही खराब झाल्याने प्रवास धोकादायक बनला असून, जीवघेणा ठरू शकतो.
पुलांवरील तुटलेली व गायब झालेली रेलिंग बसविण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. अनेक वेळा रस्त्यांची डागडुजी केली जाते; परंतु पुलांच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रवासी व वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. त्यामुळे बांधकाम विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून लवकरात लवकर असे पूल दुरु स्त करावेत, अशी मागणी चालक, प्रवासी व स्थानिकांकडून होत आहे.
कर्जत तालुक्यातील पुलावरील तुटलेल्या रेलिंग संदर्भात वर्षभरापूर्वी दुरु स्ती प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे; मंजुरी मिळाली की पुलाच्या रेलिंगची दुरु स्ती करण्यात येईल व अन्य नादुरु स्त पुलांचीही पाहणी करण्यात येईल.
- चंद्रशेखर सहनाल, उप अभियंता, सा. बा. विभाग कर्जत
कर्जत तालुक्यातील अनेक पूल धोकादायक अवस्थेत असल्याने वाहन चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने पुलांवरील रेलिंग लवकरात लवकर बसवाव्या, जेणेकरून अपघात होऊ नये.
- मच्छींद्र्र मसणे, वाहनचालक
पुलावरील तुटलेले संरक्षक पाइप बसविण्यासाठी बांधकाम विभागाकडे गतवर्षी तक्र ार केली होती; परंतु बांधकाम विभागाने अद्याप या संदर्भात कोणतीही उपाययोजना केली नाही. पुन्हा एकदा बांधकाम विभागाला कळविले जाईल.
- सुदाम पेमारे,
जिल्हा परिषद, सदस्य
तुटलेल्या पुलांवरील आणि गायब झालेल्या संरक्षक पाइप बसविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. अनेक वर्षांपासून पुलांवरील तुटलेले पाइप बसविण्यात येत नाहीत, याला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत.
- प्रवीण शिंगटे, प्रवासी