नेरळ : कर्जत तालुक्यातील नेरळ देवपाडा, वंजारपाडा ते चिंचवाडी हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. वाहनचालकांना या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे झाल्याने संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन रस्ता प्रवासायोग्य करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
नेरळ-वंजारपाडा मार्गे देवपाडा, चिंचवाडी या गावांना जोडणार्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १० किलोमीटर अंतराच्या या रस्त्याकडे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम झाले नाही. खेदाची बाब म्हणजे वंजारपाडा ते चिंचवाडी दरम्यानचा रस्ता खराब झाल्याने, नागरिकांना वर्षानुवर्षे या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. तसेच देवपाडा-वंजारपाडा या परिसरातील आदिवासी वाड्या-वस्त्यांना नेरळशी जोडणारा रस्ता झाला. मात्र देखभालीअभावी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या परिसरातील बहुसंख्य आदिवासी बांधव उदरनिर्वाहासाठी भाजीपाला लागवड करतात. याच मार्गाने त्यांना भाजीपाला विकण्यासाठी बाजारात जावे लागते.
कामगार वर्गाला याच रस्त्याने प्रवास करावा लागतोे. मात्र खराब रस्त्यामुळे रिक्षाचालक या गावांना यायला कचरतात. दुचाकी चालकांना खड्डे चुकवत प्रवास करावा लागतो. बऱ्याचदा अपघातही घडतात. गेल्या अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थ रस्ता दुरुस्तीची मागणी करीत आहेत. मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे अद्यापही येथील नागरिक रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.