माणगाव एसटी स्थानकाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 01:11 AM2021-03-09T01:11:37+5:302021-03-09T01:11:53+5:30

प्रवाशांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष; स्लॅब कोसळत असल्याने भीती

Poor condition of Mangaon ST station | माणगाव एसटी स्थानकाची दुरवस्था

माणगाव एसटी स्थानकाची दुरवस्था

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
माणगाव : मुंबई - गोवा महामार्गावरील माणगांव बसस्थानक हे मध्यवर्ती थांब्याचे ठिकाण आहे. या बसस्थानकातून पुणे, मुंबई, सुरत, रत्नागिरी यांसारख्या अनेक ठिकाणच्या बस थांबा घेऊन पुढे जातात. त्यामुळे माणगांव बसस्थानकात प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, सद्यस्थितीत या बसस्थानकाची दुरवस्था झाल्याचे दिसून येते. 

माणगाव बसस्थानकाची इमारत जुनी झाल्याने तिचा स्लॅब कधीही कोसळेल, अशा अवस्थेत आहे. या भीतीमुळे प्रवासी बसस्थानकात बसायला घाबरतात . कारण एका स्लॅबचा मलबा दिनांक ५ मार्च रोजी प्रवासी बसण्याच्या आवारात पडला. सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. परंतु, एस. टी. महामंडळाला एखाद्या प्रवाशाचा जीव गेल्यावरच जाग येईल का, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे निसर्ग चक्रीवादळात बस स्थानकावरील शेड उडल्यानंतर स्लॅबच्या वरच्या बाजूस मलमपट्टी करून स्लॅब कुणाच्याही अंगावर पडू नये म्हणून बागकामच्या वापरात असलेल्या हिरव्या जाळ्यांचा वापर संरक्षण म्हणून केला गेला. मात्र, ज्या वेळेस स्लॅबचा मलबा खाली कोसळतो, त्यावेळी ती जाळी फाटून कोसळत असल्यामुळे महामंडळाकडून प्रवाशांची चेष्टा चाललेय का, असा प्रश्न पडतो. या जीर्ण इमारतीला दरवर्षी मलमपट्टी करून एस. टी. महामंडळ दिवस लोटत आहे. बसस्थानकाच्या बाजूला नवीन बांधकाम करण्यात आले आहे. मग बसस्थानकाची दुरुस्ती का केली जात नाही. प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधादेखील बसस्थानकात उपलब्ध नाहीत. पावसाळ्यात तर बसस्थानकासमोर तळे साचलेले असते. पाणपोई आहे. पण, पाणीच येत नाही. पंखेही बंद आहेत. साफसफाईचे कायम तीनतेरा वाजलेले असतात. प्रवाशांच्या गैरसोयीचा विचार करता  महामंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

निसर्ग चक्रीवादळात बसस्थानक व माणगाव आगारावरील शेडचे नुकसान झाल्यामुळे बसस्थानकाचे बांधकाम निकृष्ट झाले आहे. या दोन्ही बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून, टेंडरदेखील निघाले आहे. स्लॅब कोसळल्याच्या दुसऱ्याच दिवशी सिव्हिल इंजिनिअरकडून या कामाची तातडीने पाहणी करण्यात आली आहे. पाणी व बांधकाम समस्यांचे लवकरच निवारण होऊन प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यास आम्ही प्रयत्नशील असू.
- चेतन देवधर, आगार व्यवस्थापक, माणगाव एस. टी. आगार

Web Title: Poor condition of Mangaon ST station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.