- कांता हाबळे नेरळ : पोशीर-माले रस्ता पुराच्या पाण्यामुळे काही ठिकाणी वाहून जाऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, तेव्हापासून महिनाभर हा रस्ता वाहतुकीस बंद होता. शेतकऱ्यांचे या रस्त्यामुळे दरवर्षी शेतीचे नुकसान होत असल्याने झालेल्या शेतीची नुकसानभरपाई द्या; नंतर रस्ता तयार करा, अशी भूमिका शेतकºयांनी घेतली होती. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात मातीचा भराव टाकून वाहने ये-जा करण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला होता; परंतु पुन्हा हा रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.नेरळ-कळंब रस्त्यावरील पोशीर-माले येथील रस्ता हा पुराच्या पाण्यामुळे दरवर्षी खचतो. त्यामुळे मातीचा भराव शेतात जात असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे, असे असताना बांधकाम विभागाने त्या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी मोरी न टाकता मागील वर्षी रस्त्यावर डांबरीकरणाचे काम केले. या अगोदर येथे आरसीसी सिमेंट काँक्रीटची भिंती बांधण्यात आली होती. त्या भिंतीही कोसळल्या आहेत, त्यामुळे हा रस्ता पुन्हा धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरून माले, आसे, फराटपाडा, आर्डे येथील विद्यार्थी व नागरिक ये-जा करत असतात; परंतु नादुरुस्त रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.ज्या ठिकाणी रस्ता खचला होता त्या ठिकाणी भराव टाकण्यात आला होता. त्या ठिकाणी पुन्हा मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावर चिखल आणि खड्डे पडले आहेत. परिणामी, येथून दुचाकी जाणेही कठीण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने लवकरात लवकर हा रस्ता चांगल्या दर्जाचा करावा, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत-२ चे उप अभियंता जी. ए. गवळी यांच्याशी या रस्त्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.>पोशीर-माले हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. उन्हाळ्यात या रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी दुरुस्ती करणे गरजेचे आहे. रस्ता बंद असल्याने आम्ही तात्पुत्या स्वरूपात मातीचा भराव आणि मोरी टाकून वाहने जाण्यासाठी रस्ता तयार केला होता. रस्ता तयार करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे.- पी. एस. गोपणे, शाखा अभियंता,जिल्हा परिषद बांधकाम विभाग, कर्जत>पुराच्या पाण्याने दरवर्षी हा रस्ता खचतो, यावर्षी मोठ्या प्रमाणात रस्ता खचून शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावर मातीचा भराव टाकून रस्ता तयार करण्यात आला होता; परंतु रस्त्यावर पुन्हा चिखल आणि खड्डे पडल्याने या रस्त्यावरून दुचाकी चालवणेही कठीण झाले आहे, असे असताना बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे.- हरिश्चंद्र वेहले, ग्रामस्थ, माले
पोशीर-माले खचलेला रस्ता धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:07 AM