कळंब-बोरगाव रस्त्याचे निकृष्ट काम पाडले बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 12:09 AM2018-12-06T00:09:05+5:302018-12-06T00:09:12+5:30
कर्जत तालुक्यातील कळंब-बोरगाव रस्त्यावर अनेक वर्षांनंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे;
- कांता हाबळे
नेरळ : कर्जत तालुक्यातील कळंब-बोरगाव रस्त्यावर अनेक वर्षांनंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे; परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने हे काम उंबरखांड आणि बोरगाव ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेऊन पोलिसांच्या मदतीने बंद पाडले आहे.
कळंब-बोरगाव या एक कि.मी.च्या रस्त्याचे काम गेले दोन दिवस सुरू आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी कामाची पाहणी केल्यानंतर या पूर्वीच्या रस्त्यावर डांबर न टाकता केवळ खडी टाकण्याचे काम सुरू होते. याबाबत ग्रामस्थ एकनाथ खडेकर, दत्ता खडेकर व इतर ग्रामस्थ मंडळींनी याबाबत जाब विचारला असता ठेकेदारांनी अरेरावी केली व तुम्हाला कुणाकडे तक्रार करायची ती करा, असे उत्तर दिले. याबाबत ग्रामस्थांनी पत्रकारांना बोलावून सदर रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचे खडी बाजूला करून दाखवून दिले.
>ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात
कळंब-बोरगाव या रस्त्याला तात्पुरता पर्यायी मार्ग असतानाही ठेकेदारांनी हे काम रात्री उशिरा अतिशय घाईत उरकण्यास सुरुवात केल्याने ग्रामस्थ संतापले व त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. या रस्त्याने उंबरखाड, बोरगाव, कळंब व आदिवासी वाड्यातील प्रवासी ये-जा करीत असतात; पण रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने खडी अंथरून काम सुरू केले होते.
या ग्रामीण भागातील रस्त्यावर दहा ते पंधरा वर्षे पुन्हा रस्त्याचे काम होत नाही. ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करतात. त्यामुळे लगेचच हा रस्ता उखडतो आणि रस्त्यावर पुन्हा खड्डे पडतात, म्हणूच ग्रामस्थांनी हे निकृष्ट दर्जाचे काम पाहत पोलिसांच्या मदतीने बंद पाडले. पुन्हा चांगल्या दर्जाचा रस्ता तयार करण्याची मागणी केली आहे.
सदर कामाची पाहणी करून त्या रस्त्याचे काम व्यवस्थित करण्यात येईल. या रस्त्याचे काम त्वरित थांबवण्याबाबत संबंधित ठेकेदारांना कळविण्यात आले आहे. सदर रस्ता ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे कार्यादेशानुसार करण्यात येईल.
- के. ए. केदारे, उप अभियंता, रायगड जिल्हा परिषद,
बांधकाम विभाग
सदर रस्त्यावर कुठेही डांबर टाकलेले दिसत नाही. रस्त्याचे काम निकृष्ट आहे. याबाबत काम करणाऱ्या ठेकेदारांना विचारणा केली असता त्यांनी अरेरावीची भाषा केली. सदर रस्त्याचे काम मंगळवारी रात्री ७ वाजेपर्यंत अंधारात चालू होते. यावरून काम किती घाईत उरकण्यात आले आहे याची कल्पना येते. हा रस्ता ग्रामस्थांच्या उपस्थितीत व्यवस्थित करून द्यावा.
- दत्तात्रेय खडेकर,
ग्रामस्थ, बोरगाव