पोसरी-साळोख रस्ता दोन महिन्यांत उखडला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 10:32 PM2019-07-26T22:32:35+5:302019-07-26T22:33:47+5:30
ग्रामस्थ संतप्त : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील काम निकृष्ट
नेरळ : कर्जत तालुक्यातील पोसरी-आरवंद-साळोख या साडेचार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दोन महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या रस्त्याची अवघ्या दोन महिन्यांत दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांनी ठेकेदाराची बाजू घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
कर्जत-मुरबाड रस्त्याला लागून असलेल्या पोसरी गावापासून आरवंद-साळोख या साडेचार किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी २०१९ या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजुरी देण्यात आली होती. कामाचे कंत्राट हे ठाणे येथील कंपनीने घेतला होता. मार्चमध्ये कामाला सुरुवात करून कंत्राटदार कंपनीने मे माहिन्यांत डांबरीकरण काम पूर्ण केले होते; परंतु ही कंपनी मोठी असल्याने अधिकारीही या रस्त्याच्या कामाकडे फिरकले नाहीत, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
जूनमध्ये शेवटच्या आठवड्यात तर जुलै महिन्यात फार किरकोळ पाऊस होऊनही रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देत नाहीत. त्यामुळे ठेकेदार कंपनी रस्त्यावर डांबर कमी प्रमाणात टाकत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आमचा प्रवास अनेक वर्षे खड्ड्यातून सुरू होता आणि आता पुन्हा दोन कोटी रुपये खर्च करून केलेल्या रस्त्यावरून जातानाही खड्ड्यातून प्रवास करावा लागणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे हा रस्ता पुन्हा चांगल्या दर्जाचा करून घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थ नील मुने, अतिष मुने, लक्ष्मण मुने, दिलीप ढोले आदी ग्रामस्थांनी केली आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या नियमानुसार रस्त्याचे काम झाले आहे. रस्त्याच्या ठिकाणी आम्ही भेटी दिल्या आहेत. मात्र, ग्रामस्थांना त्याबाबत माहिती नसेल; परंतु आम्ही कामाचा दर्जा टिकून राहील असेच काम करून घेणार आहोत. - व्ही. ए. खेडेकर, शाखा अभियंता,
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना
अनेक वर्षांनंतर आमच्या रस्त्यावर डांबरीकरण झाले होते. मात्र, ठेकेदाराने या रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे काम केल्याने दोन महिन्यांत रस्ता उखडला आहे. अधिकारी वर्गानेही याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी आणि रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करून द्यावे. - नील मुने, ग्रामस्थ, बारणे