पोशीर ग्रामसभेला अधिकारी गैरहजर
By admin | Published: October 4, 2016 02:43 AM2016-10-04T02:43:42+5:302016-10-04T02:43:42+5:30
कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतींच्या नियोजनशून्य कारभारावर आसूड ओढला.
कांता हाबळे , नेरळ
कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतींच्या नियोजनशून्य कारभारावर आसूड ओढला. सभेबाबत कळवूनही पंचायत समिती गटविकास अधिकारी उपस्थित न राहिल्याने पंचायत समितीचे कसलेच नियंत्रण नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
२ आॅक्टोबर महात्मा गांधी जयंतीदिनी आयोजित करण्यात आलेल्या या ग्रामसभेची सुरु वात महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. मागील ग्रामसभेचे इतिवृत्त न वाचताच सभेला सुरु वात केली यावर ग्रामस्थांनी विचारणा केली असता आचारसंहिता असल्याने ती सभा अधिकृत नव्हती असे उत्तर ग्रामसेवकांनी दिले. मुद्रांक शुल्काबाबत ग्रामसेवक पूर्ण माहिती देण्याचा शब्द ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पाळला नाही या प्रकरणी माझी चौकशी सुरू आहे असे सांगून त्यांनी माहिती देण्याचे टाळले. ग्रामसभेचा विषय व कार्यक्रमपत्रिका याबाबत ग्रामस्थांना पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. महिला ग्रामसभेची कल्पना गावातील महिलांना का देण्यात आली नव्हती.महिला ग्रामसभेबाबत उदासीनता का या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर ग्रामस्थांना मिळू शकले नाही.
ग्रामविकास अधिकारी सभेचा प्रोटोकॉल स्वत: च पाळत नसल्याचा आरोप ग्रामस्थ प्रवीण शिंगटे यांनी केला. मुद्रांकशुल्क प्रकरण व दप्तर चौकशीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन या सभेला गटविकास अधिकारी पंचायत समिती कर्जत यांना उपस्थित राहण्याबाबत विनंतीपत्र काही ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी दिले होते. त्यांनी क्षेत्रीय अधिकारी उपस्थित राहतील असे सांगितले होते. परंतु कर्जत पंचायत समितीचा कोणताही अधिकारी या सभेला उपस्थित राहिला नाही यावरून या सभेचे कसलेच गांभीर्य पंचायत समितीला नसल्याची खंत प्रवीण शिंगटे यांनी व्यक्त
केली.
ग्रामपंचायतीचा संशयित कारभार वारंवार चव्हाट्यावर आला असूनही गटविकास अधिकारी यांचे कसलेच नियंत्रण नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ग्रामसभेत किती अपंग निधी वितरण केला याबाबत ग्रामस्थांनी माहिती मागितली असता ती देण्यात आली नाही.
अखेरीस प्रवीण शिंगटे यांनी माहिती अधिकारात मिळवलेली माहिती ग्रामस्थांनी वाचून दाखवली. यात २९ अपंगांना अद्याप लाभ मिळाला नसल्याचे उघड झाले.असे का याबाबत ग्रामसेवक उत्तर देऊ शकले नाहीत. इंदिरा आवास (पंतप्रधान निवास) घरकूल योजनेअंतर्गत अनुक्र म डावलून काही लाभार्थ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचे ग्रामस्थ प्रवीण शिंगटे यांनी निदर्शनास आणले. यावर ग्रामविकास अधिकारी व सदस्यांना माहिती देता आली नाही. तसेच पर्यावरण निधीबाबत ग्रामस्थांनी माहिती मागितली असता पर्यावरण निधीबाबत कसलीच तरतूद नसल्याचे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावर ग्रामविकास अधिकारी हे धादांत खोटे बोलत असून त्याची माहिती अधिकार्यान्वये मिळालेल्या माहितीनुसार २०१२-१३ या कालावधीकरिता निधी अनुदानित होता याची माहिती प्रवीण शिंगटे यांनी दिली. यावर त्या निधीचा विनियोग कसा केला याची माहिती देखील ग्रामसेवक यांनी दिली नाही.
यावर जी माहिती ग्रामस्थांना पंचायत समितीतून मिळवावी लागते ती माहिती ग्रामसभेने मागून ग्रामसेवक देत नाहीत याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.