हवामानाबाबत सकारात्मक पद्धतींचा अवलंब गरजेचा - समीर बुटाला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 04:51 AM2019-03-23T04:51:11+5:302019-03-23T04:51:24+5:30
जागतिक तापमानाचे संवर्धन आणि त्याबाबतची जाणीव होण्यासाठी जागतिक हवामानशास्त्र संघटनेच्या माध्यमातून २३ मार्च हा दिवस जागतिक हवामानशास्त्र दिन म्हणून १९५० पासून साजरा केला जातो.
- जयंत धुळप
अलिबाग - जागतिक तापमानाचे संवर्धन आणि त्याबाबतची जाणीव होण्यासाठी जागतिक हवामानशास्त्र संघटनेच्या माध्यमातून २३ मार्च हा दिवस जागतिक हवामानशास्त्र दिन म्हणून १९५० पासून साजरा केला जातो. या वर्षी भारत सरकारने ‘हवामान’ हीच संकल्पना घेऊन हा दिन साजरा करण्याचे ठरवले आहे. अत्यंत वेगाने बदलत्या हवामानाच्या काळात पृथ्वीवरील मानवी अस्तित्वाच्या पार्श्वभूमीवर या विषयाबाबत अत्यंत सजगतेने जाणून घेऊन सकारात्मक पद्धतींचा अवलंब करणे नितांत गरजेचे आहे. त्याचबरोबर भारतवासीय जगाच्या पर्यावरण जनजागरणाच्या तुलनेत या हवामानशास्त्रकडे कशा प्रकारे पाहतात हे महत्त्वाचे असल्याची भूमिका पोलादपूर येथील सुंदरराव मोरे महाविद्यालयाच्या भूगोल विभागाचे प्रमुख भूगोलतज्ज्ञ प्रा. डॉ. समीर अरु ण बुटाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली आहे.
हवामानाचा उगम आणि त्याच्या परिणामांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ‘हवामानशास्त्र’. पूर्वीपासून हवामानशास्त्रज्ञ हवामानशास्त्राच्या परिणामांचा शोध लावण्याचा आणि ते परिणाम स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेणेकरून समाज उपक्र मांचे नियोजन करू शकतील, इमारती व पायाभूत सुविधा निर्माण करू शकतील आणि प्रतिकूल परिस्थितीच्या परिणामांचा अंदाज बांधू शकतील. म्हणजे वातावरणातील तापमान, पर्जन्य, वारे आणि सौरऊर्जा या हवामानशास्त्राच्या विविध शाखा आहेत. याचबरोबर भौतिक हवामानशास्त्र, गतिशील हवामानशास्त्र, संक्षिप्त हवामानशास्त्र, प्रादेशिक हवामानशास्त्र आणि उपयोजित हवामान असे हवामानशास्त्राचे प्रकार असल्याचे प्रा.डॉ.बुटाला यांनी सांगितले.
गेल्या कित्येक दशकातून हवामानाशी संबंधित असलेल्या हवामानाच्या विविध संकल्पना दरवर्षी घोषित केल्या जातात. २००३ मध्ये ‘आपले भविष्य आणि हवामान’ ही संकल्पना होती तर २००४ मध्ये ‘हवा,पाणी, हवामान यांच्या माहितीचे वर्ष’ या संकल्पनेवर जनजागृती करण्याचा प्रयत्न केला गेला. २००५ मध्ये ‘हवा, पाणी आणि हवामान यांचा चिरंतर विकास कसा साधता येईल’ हा विचार मांडण्यात आला. २००६ मध्ये ‘येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून वाचवण्याचे उपाय आणि धोरणे’ ठरविण्यात आली. २००७ मध्ये ‘ध्रुवीय हवामानशास्त्र व त्याचे जागतिक परिणाम’ हा विषय मांडण्यात आला. २००८ मध्ये ‘भविष्यातील आपली पृथ्वी एक चांगला उपग्रह’ अशी संकल्पना मांडली होती. २००९ मध्ये ‘हवेचे पट्टे व त्यातील होणाऱ्या बदलांचा अभ्यास’ असा विषय होता. २०१० मध्ये ‘गेल्या साठ वर्षांतील हवामानाची सुरक्षितता आणि भविष्य’ असा विषय होता. २०११ मध्ये ‘हवामान तुमच्यासाठी’,२०१२ मध्ये ‘हवामान आणि पाणी आपल्या भविष्यातील शक्ती’ २०१३ मध्ये ‘हवामानाचे निरीक्षण आणि हवामान वाचवा’ ,२०१४ मध्ये ‘हवामान आणि हवा हे तरु णाईला गुंतविणारे घटक’, २०१५ मध्ये ‘हवा व हवामानाची संकल्पना आणि त्यावरील निर्णय’, २०१६ मध्ये ‘उष्ण हवा आणि मानवाचा भविष्यातील चेहरा’, २०१७ मध्ये ‘हवामानातील एक प्रमुख घटक म्हणजे ढग व त्याचे प्रकार आणि त्यांचे महत्त्व’ हा विषय होता. गतवर्षी २०१८ मध्ये ‘हवा आणि हवामानातील बदलांत होत असणारे बदल’ अशा संकल्पना होत्या. या संकल्पनांचाच विचार केला तर हा विषय किती गांभीर्याचा आहे हे लक्षात येत असल्याचे बुटाला यांनी सांगितले.
संयुक्त प्रयत्नांची गरज
२००३ पासून आजपर्यंत जागतिक हवामानशास्त्र संघटनेने हवामान संवर्धनाचे महत्त्व जगभरातील लोकांच्या लक्षात यावे म्हणून वेगवेगळे विषय लोकांसमोर ठेवले व तशी हवामानाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न जागतिक हवामानशास्त्र संघटना करीत आहे.
मात्र, या विषयाबाबत ज्या प्रखरतेने जनजागृती होणे अपेक्षित आहे ती होताना दिसत नाही. त्याकरिता विविध महाविद्यालये, स्वयंसेवी युवा संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नातून येत्या काळात प्रयत्न गरजेचे असल्याचे प्रा. डॉ. समीर बुटाला यांनी अखेरीस नमूद केले आहे.