बाबासाहेब गव्हाणकर यांची माथेरानमध्ये होणार ज्ञानज्योत, नगरपालिकेची सकारात्मक भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 03:01 AM2018-02-16T03:01:08+5:302018-02-16T03:01:17+5:30
माथेरानमध्ये शिक्षणाची गंगा आणणारी एकमेव विभूती अर्थातच प्राचार्य शांताराम यशवंत ऊर्फ बाबासाहेब गव्हाणकर होय. गव्हाणकर यांनी १९६९ मध्ये सरस्वती विद्या मंदिर ही माध्यमिक शाळा सुरू केल्यामुळे आज सर्वच मुले, मुली शिक्षण घेऊन प्रत्येक क्षेत्रात भक्कमपणे स्थिरावले आहेत.
माथेरान : माथेरानमध्ये शिक्षणाची गंगा आणणारी एकमेव विभूती अर्थातच प्राचार्य शांताराम यशवंत ऊर्फ बाबासाहेब गव्हाणकर होय. गव्हाणकर यांनी १९६९ मध्ये सरस्वती विद्या मंदिर ही माध्यमिक शाळा सुरू केल्यामुळे आज सर्वच मुले, मुली शिक्षण घेऊन प्रत्येक क्षेत्रात भक्कमपणे स्थिरावले आहेत. बाबासाहेब यांनी येथे शिक्षणाचा पायाच रोवला. बाबासाहेब यांच्या पश्चात त्यांच्या आठवणींना उजाळा तसेच त्यांच्या महान कार्याचा लेखाजोखा भावी पिढीला स्मरणात राहावा यासाठी बाबासाहेब यांच्या नावाची ज्ञानज्योत माथेरानमधील सात पॉइंट्सच्या मध्यवर्ती भागातील वखारी नाका येथे असायला हवी अशी माजी विद्यार्थ्यांची अनेक वर्षांपासून मागणी होती. याबाबत सकारात्मकता नगरपालिके ने दाखविली नव्हती, मात्र ‘लोकमत’मध्ये ‘माथेरानमध्ये स्मारकाऐवजी कारंजांना प्राधान्य’ अशा मथळ्याखाली बातमी प्रसिध्द होताच नगरपालिकेने येथे सुध्दा ज्ञानज्योत बसविण्यात येणार असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले.
मागील दहा वर्षांपूर्वी वखारी नाका येथे ज्ञानज्योत बसविण्यासाठी भूमिपूजन सुद्धा करण्यात आले होते. याच भागात हॉटेल बाईक यांचा अनेक वर्षांपासून नगरपालिकेच्या हद्दीत नादुरुस्त अवस्थेतील कारंजा आहे. त्याची डागडुजी हॉटेलधारकाने केली नव्हती. त्यामुळे हा भाग जाण्या-येण्यासाठीही अडचणीचा ठरत होता. एवढ्या वर्षानंतर या कारंज्याच्या दुरु स्तीचे काम हॉटेलधारकाने हाती घेतल्यावर आजी -माजी विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसून येत होती. कारंजा दुरु स्त होत आहे. मात्र बाबासाहेब यांच्या ज्ञानज्योती बाबतीत काहीच विचार नगरपालिका करीत नाही. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर नगरपालिकेने सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे स्थानिकांसह सर्वांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत. बाबासाहेब गव्हाणकर यांचे स्मारक या ठिकाणी होणार असल्याने विद्यार्थी आनंदित झाले आहेत.