काळी जादू करण्याच्या प्रयत्नात असणारे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:14 PM2018-12-29T23:14:10+5:302018-12-29T23:14:19+5:30
येथील वरसोली गावातील स्मशानभूमीत जळत्या प्रेताजवळ काळी जादू करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांना पोलिसांनी एका मांत्रिकासह त्याच्या पाच साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
अलिबाग : येथील वरसोली गावातील स्मशानभूमीत जळत्या प्रेताजवळ काळी जादू करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांना पोलिसांनी एका मांत्रिकासह त्याच्या पाच साथीदारांना ताब्यात घेतले आहे. ग्रामस्थांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ उदबत्त्या, करवंटी, लिंबू, दारूच्या बाटल्या, मेणबत्त्या, भात, शिजवलेले तयार मटण, पत्रावळी अशा वस्तू आढळल्या आहेत. अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रि या रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
वरसोली गावातील ग्रामस्थ राकेश घरत यांची पत्नी वैभवी घरत हिचे २८ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यानंतर ग्रामस्थांनी राकेश यांच्या पत्नीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रात्रीच्या सुमारास वरसोली येथील स्मशानभूमीत आणून त्यावर अंत्यसंस्कार केले. त्याच वेळी स्मशानभूमीच्या बाहेर काही अज्ञात व्यक्ती होत्या. त्यातील काही जण स्मशानभूमीत डोकावून पाहत होते, या बाबत ग्रामस्थांनी त्यांना हटकले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.
त्यांचा संशय आल्याने ग्रामस्थांनी त्यांना पकडून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे वरील वस्तू सापडल्या. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता जेवण करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. जेवणासाठी तुम्हाला दुसरीकडे जागा नव्हती काय? असा प्रतिप्रश्न केल्यावर ते चांगलेच घाबरले. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना फोन करून बोलवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्या पाच जणांना ताब्यात घेतले.
गावातील एक महिला आजारी असल्याने स्मशानभूमीत उतारा काढायला आलो होतो, असे त्यांनी पोलिसांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकाराबाबत वरसोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच हर्षल नाईक यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात लेखी तक्र ार केली.
ग्रामस्थ म्हणतात...
एक सवाशिण महिला मरण पावल्यानंतर तिच्या देहातील एखादे हाड काळी जादू करण्यासाठी वापरले जाते, असे ग्रामस्थांकडून बोलले जाते. त्यासाठीच त्या व्यक्ती स्मशानभूमीत आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.