वाघाच्या कातडीचे तस्कर ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 04:34 AM2018-04-22T04:34:06+5:302018-04-22T04:34:06+5:30
साध्या वेषात आलेल्या पोलिसांनी कसलाच सुगावा लागू दिला नव्हता.
खालापुर : वाघाच्या कातडी तस्करी प्रकरणात खालापूर तालुक्यातील चौक गावातील चार तरुणांना कल्याण क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. चौकशीनंतर दोघांना रात्री सोडण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, कारवाईचा स्थानिक पोलिसांना सुगावा लागू दिला नाही. गुरुवारी दुपारी साध्या वेषात आलेल्या कल्याण क्राइम ब्रँचच्या पथकाने चौक गावातील विशाल लक्ष्मण धनराज, सचिन म्हात्रे, प्रमोद हातमोडे व चौक नजीक आसरे गावातील पोपेटा (पूर्ण नाव माहीत नाही) या चौघा तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. साध्या वेषात आलेल्या पोलिसांनी कसलाच सुगावा लागू दिला नव्हता. त्यामुळे काही इसमांबरोबर गेलेला विशाल बराच वेळ परत न आल्यामुळे त्याचे अपहरण झाले असावे, अशी शंका घेऊन विशालच्या घरच्यांनी त्याचे अपहरण झाले असावे, म्हणून चौक पोलीसचौकी गाठली होती. रात्री उशिरा सचिन म्हात्रे व प्रमोद हातमोडे यांना चौकशीनंतर सोडल्यानंतर ते चौक गावात आले. त्यानंतर सर्व खुलासा झाला.
वाघांचे कातडे तस्करी प्रकरणात विशाल धनराज व पोपेटा यांची अधिक चौकशी सुरू असून, चौक गावात मात्र खळबळ माजली आहे. वाघ नखे घेणारे चौकमधील प्रतिष्ठित लोक असून, त्यांना अटक होणार आहे. दरम्यान, वाघ नखे घेणाºयांना क्राइम ब्रांच पथकाने अर्थपूर्ण मोकळीक दिल्याचे बोलले जात आहे.
विषय गंभीर असल्यास अनेकदा स्थानिक पोलिसांना कारवाईची माहिती दिली जात नाही. आरोपी सावध होऊन फरार होण्याची शक्यता असल्यामुळे कल्याण क्राइम ब्रँचच्या पथकाने गुप्त कारवाई केली असून, स्थानिक पोलीस घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत.
- महेंद्र शेलार, सपोनी,
चौक पोलीस दूरक्षेत्र