पालीमध्ये लॉकडाऊन वाढण्याची शक्यता; कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 04:22 AM2020-07-02T04:22:26+5:302020-07-02T04:22:35+5:30
सुधागड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी तिन्ही रुग्ण वावळोली येथील कोविड सेंटरमध्ये योग्य प्रकारे उपचार घेत आहेत.
पाली : सुधागड तालुक्यातील मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पाली शहरात शनिवारी एका तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आणि बुधवारी १ जुलैला या रुग्णाची आई आणि पत्नी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालीत कोरोना बधितांची संख्या तीनवर गेली आहे.
पहिला रुग्ण सापडल्यानंतर खबरदारी म्हणून रविवार २८ जून ते बुधवार १ जुलै पाली बाजारपेठ व्यापारी असोसिएशन व ग्रामपंचायतीच्या वतीने उत्स्फूर्त बंद ठेवण्यात आली आहे. मात्र हे लॉकडाऊन रविवार ५ जुलैपर्यंत वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सायंकाळी पाली तहसील कार्यालयात बैठक होणार आहे. प्रशासन कोरोनाच्या संदर्भात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी तालुक्यातील जनतेला केले.
तर सुधागड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी तिन्ही रुग्ण वावळोली येथील कोविड सेंटरमध्ये योग्य प्रकारे उपचार घेत आहेत. या रुग्णांच्या नजिकच्या संपर्कात आलेल्यांना देखील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्या येथे एकूण १२ जण आहेत. नागरिकांनी सावधान राहावे, घाबरून जाऊ नये पण नियम पाळून काळजी घेणे गरजेचे आहे. असे डॉ. मढवी म्हणाले. सुधागड तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण नुकतेच बरे होऊन घरी परतले होते. मात्र तालुक्याचे मुख्यालयाचे ठिकाण असलेले पाली कोरोनापासून दूर होते.