पावसाअभावी भातशेती करपण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 03:49 AM2018-08-04T03:49:48+5:302018-08-04T03:50:00+5:30
गेल्या १० दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील भात शेती धोक्यात आली आहे. शेतात पाणी नसल्याने जमिनींना भेगा पडल्या आहेत. पावसाच्या सरी मध्येच बरसत असल्या तरी शेतीसाठी त्या पूरक नाहीत.
अलिबाग : गेल्या १० दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील भात शेती धोक्यात आली आहे. शेतात पाणी नसल्याने जमिनींना भेगा पडल्या आहेत. पावसाच्या सरी मध्येच बरसत असल्या तरी शेतीसाठी त्या पूरक नाहीत. अशीच परिस्थिती राहिल्यास भात पीक करपून आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. परंतु सध्याचा पाऊस हा समाधानकारक असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.
जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्येच पावसाने जोरदार बरसून आपले मनसुबे स्पष्ट केले होते. हवामान विभागानेही वेळोवेळी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पाऊस समाधानकारक पडत होता. अख्खा जून महिना तसेच जुलै महिन्यामध्ये पावसाने चांगलाच जोर धरला. त्यामुळे शेतीच्या कामांनीही जोर पकडला होता. जिल्ह्यामध्ये भाताचे प्रमुख पीक घेतले जाते. त्यानुसार सर्वत्र मोठ्या संख्येने भाताची लावणी पूर्ण झाली आहे.
भाताच्या पिकाने तग धरायला सुरुवात केली असतानाच आता पावसाने पाठ फिरवली आहे. गेले १० दिवस पाऊस लहरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच अधे-मधे कडक उन्हाच्या झळा बसत असल्याने अलिबाग तालुक्यातील काही ठिकाणच्या शेतातील जमिनीला
भेगा पडण्यास सुरुवात झाली
आहे.
भात पिकाला पुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही तर भाताचे पीक करपण्याची शक्यता असल्याचे खंडाळे येथील शेतकरी नंदू सोडवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. पावसाची उघडीप कायम राहिल्यास ते शेतीला नक्कीच परवडणारे नसल्याने शेतकऱ्यांना फार मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी भातासोबतच बांधावर शेती करताना विविध भाजीपाला, मिरची, टोमॅटो यांचेही पीक घेतात. या पिकांनाही पाण्याची आवश्यकता असल्याने छोटे उत्पन्नही संकटात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक बाजारात रोजचीरोज ताजी भाजी उपलब्ध होत असते, परंतु पावसाची नाराजी अशीच राहिल्यास स्थानिक बाजारांमध्ये स्थानिक पातळीवरचा भाजीपाला मिळणे कठीण होणार आहे. छोट्या प्रमाणात अशी भाजी विकणारेही आर्थिक संकटात सापडणार असल्याचे बोलले जाते.
पावसाच्या आकेडवारीवर नजर टाकल्यास जून महिन्यात ९११.२५ मिमी सरासरी (१४१.६७ टक्के) पाऊस पडला होता. जुलै महिन्यातील पावसाच्या कामगिरीकडे पाहिल्यास १३२८.३४ मिमी सरासरी (११४.५८ टक्के) पाऊस झाला आहे, तर आॅगस्ट महिन्यात फक्त ३६.०७ मिमी सरासरी (०४.०८ टक्के) पाऊस झाला आहे. अजून पावसाचा हंगाम शिल्लक असला तरी, भात पिकाला वेळेवर मुबलक पाणी मिळाले नाही तर पीक संकटात येऊ शकते. त्यामुळे पावसाने बरसून बळीराजापुढील संकट दूर करावे अशी आर्त विनवणी करण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यात पाऊस कमी झाला आहे, परंतु तो अधूनमधून बरसत असल्याने शेतामध्ये सध्या पुरेसे पाणी आहे. त्यामुळे शेतकºयांनी चिंता करण्याचे कारण नाही.
-पांडुरंग शेळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी