आमदारांच्या मर्जीनुसार पोलिसांच्या ‘पोस्टिंग’? पोलिस वर्तुळात नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2023 11:26 AM2023-06-21T11:26:37+5:302023-06-21T11:27:10+5:30
पोस्टिंग जर त्यांच्या इच्छेनुसार होणार असल्यास गुणवत्ता काय कामाची?, असा सवाल पोलिस अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
अलिबाग : लोकप्रतिनिधींच्या वाढत्या हस्तक्षेपाबाबत प्रशासनाकडून नाराजी व्यक्त होत असताना आता जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) प्रमुख पदासह महत्त्वाच्या नियुक्त्या आमदारांच्या मर्जीवर होण्याची चिन्हे आहेत. मोक्याच्या पोस्टिंगसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा सत्तारूढ पक्षाच्या आमदारांची मर्जी मिळविण्यासाठी इच्छुक अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू असून तीन आमदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला जात आहे.
पोस्टिंग जर त्यांच्या इच्छेनुसार होणार असल्यास गुणवत्ता काय कामाची?, असा सवाल पोलिस अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
राज्याच्या पोलिस महासंचालकांकडून शुक्रवारी निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या ४४९ बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये रायगडमधून ५ जणांची अन्यत्र बदली झाली. तर ६ अधिकारी अन्य ठिकाणाहून जिल्ह्यात हजर झाले आहेत. जिल्ह्यातून बदली झालेल्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून ‘डिटेक्शन’पेक्षा ‘कलेक्शन’मुळे जास्त चर्चेत असलेल्या ‘एलसीबी’चा समावेश आहे. पूर्वीचे प्रमुख दयानंद गावडे यांची ‘एसीबी’मध्ये बदली झाल्याने त्यांचा वारसदार म्हणून कोणाकडे धुरा सोपविली जाते, याकडे जिल्हा पोलिस वर्तुळासह विभागाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्कात असलेल्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
‘एलसीबी’साठी नवी मुंबईतून बदलून आलेले शत्रुघ्न माळी, चंद्रपूरहून आलेले बाळासाहेब खाडे आणि खोपोलीचे निरीक्षक शिरीष पवार यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र सत्तारूढ पक्षाचे तीन आमदार ज्याच्या नावाचा आग्रह धरतील, त्याचीच वर्णी लागली जाईल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या लोकप्रतिनिधींनी यशस्वी ‘चर्चा’ करण्यासाठी इच्छुकांचे प्रयत्न सुरू आहेत. महत्त्वाच्या पोलिस ठाण्याच्या प्रभारी पद व अन्य नियुक्तीसाठी त्यांच्या शब्दाला वजन असल्याने इच्छुकांकडून त्यांची मर्जी राखण्यावर भर दिला जात आहे.
...तर गुणवत्ता काय कामाची?
तमाच्या गुणवत्तेपेक्षा अन्य निकषाला अधिक महत्त्व दिले जात असल्यास कोणाच्याही दबावाखाली कायदा व सुव्यवस्थेचे काम कसे सुरळीतपणे केले जाईल, असा सवाल पोलिस अधिकाऱ्यांतून व्यक्त केला जात आहे.