पनवेल : कोकण, मुंबईच्या प्रवासासाठी केंद्रबिंदू असलेल्या पनवेल बस डेपोमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे प्रवाशांसह बस चालकांना त्रासाला सामोरे जावे लागते. अनेक दिवसांपासून डेपो नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असून, आता डेपोत खड्डे पडल्याने प्रवासी त्रस्त आहेत.पनवेल बसस्थानक प्रशासनाकडून अनेक गोष्टींमध्ये प्रवाशांच्या सोयी- सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. एसटी स्थानकात मोठमोठे खड्डे पडले आहेत. बसस्थानकातील खड्डे बुजविण्यात आलेले नाही. त्यामुळे पडलेल्या खड्ड्यांतूनच विद्यार्थी व वयोवृद्ध प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. दोन दिवस पडलेल्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन धावणारी एसटी या ना त्या कारणाने वारंवार चर्चेत असते. सध्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. स्थानकात पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे, तर एसटी गाड्यांमुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्ड्यांमध्ये प्रवासी व विद्यार्थी घसरून खाली पडत आहेत. त्यामुळे त्यांना दुखापत होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.आगारात मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांच्या दुरु स्तीबाबत अनेक वेळा सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटनांकडून आंदोलनेही करण्यात आली आहेत. तरीही आगार प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात नाही. आगारामध्ये दररोज हजारोच्या संख्येने विद्यार्थी व प्रवासी ये-जा करत असतात. या ठिकाणी परजिल्ह्या, तसेच परराज्यातीलही प्रवासी येत असतात. त्यांच्याकडून या ठिकाणी असलेल्या गैरसोयीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. आगार व्यवस्थापकांकडून विद्यार्थी व प्रवाशांच्या गैरसोयी लक्षात घेऊन बांधकाम ठेकेदाराला आगारातील खड्डे बुजवून चांगला रस्ता तयार करण्याच्या सूचना देणे गरजेचे आहे. मात्र, तशा सूचना आगार व्यवस्थापकांकडून केल्या जात नसल्याने संपूर्ण पावसाळ्यात खड्डे पडलेल्या स्थानकातूनच प्रवास करावा लागणार असल्याचे प्रवाशांमधून व्यक्त केले जात आहे.
पनवेल बस डेपोमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:35 AM