खड्ड्यांचा फटका सरकारी कामकाजाला

By admin | Published: August 13, 2015 11:28 PM2015-08-13T23:28:15+5:302015-08-13T23:28:15+5:30

पळस्पे (पनवेल) ते कशेडी (पोलादपूर) दरम्यानच्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांची समस्या दूर करण्यात शासनाला अद्याप यश आलेले नाही

The pothole hit government work | खड्ड्यांचा फटका सरकारी कामकाजाला

खड्ड्यांचा फटका सरकारी कामकाजाला

Next

अलिबाग : पळस्पे (पनवेल) ते कशेडी (पोलादपूर) दरम्यानच्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांची समस्या दूर करण्यात शासनाला अद्याप यश आलेले नाही. महामार्ग आणि जिल्ह्यातील राज्यमार्ग व अन्य मार्गावरील खड्डे हे केवळ पावसामुळे पडलेले नाहीत तर शासनाच्या निष्क्रिय कारभाराचे ते खड्डे असल्याची संतप्त भावना प्रवासी व्यक्त करत आहे. शासकीय निष्क्रियतेच्या या खड्ड्यांचा परिणाम आता जिल्ह्यातील प्रशासकीय सेवांवर होत आहे.
रायगड जिल्ह्यात शासनाच्या विविध कार्यालयांत कार्यरत तब्बल २५ हजार ९४६ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनसामान्यांना प्रशासकीय सेवा देण्यात येते. यामध्ये येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्ह्यातील आठ उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालये आणि १५ तहसीलदार कार्यालयांमध्ये एकूण ३ हजार ७०० राज्य शासनाचे कर्मचारी कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त केंद्र शासनाचे १ हजार ७०० कर्मचारी जिल्ह्यात कार्यरत आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील १५ पंचायत समिती कार्यालये व संलग्न सेवांमध्ये जिल्हा परिषदेचे कर्मचारी व तृतीय श्रेणी कर्मचारी असे एकूण २० हजार ५४६ कर्मचारी कार्यरत आहेत. या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ६० टक्क्यांच्यावर कर्मचारी दररोज एसटी बसने प्रवास करून कामावर येतात.
सध्याच्या रस्त्यांच्या खड्डे व गंभीर दुरवस्थेमुळे आणि त्यामुळे दररोज हमखास होत असलेली वाहतूक कोंडी यामुळे एसटी प्रवासास दररोज नियोजित कालावधीपेक्षा किमान दीड तास तर कमाल दोन ते अडीच तासांचा विलंब होत आहे. कर्मचारी नियोजित वेळेपेक्षा तास दीड तास उशिरा आपापल्या कार्यालयात पोहोचतात तर संध्याकाळी घरी देखील तितक्याच विलंबाने पोहोचत असल्याने सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘बायोमेट्रिक अटेंडन्स मशिन्स’ लावण्यात आल्याने त्यावर ‘लेट मार्क’ पंच होतो. महिन्यात तीन वेळा ‘लेटमार्क’ पंच झाल्यास एक रजा कापण्याचा शासनाचा नियम असल्याने, हा भुर्दंड कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे काही सरकारी कर्मचाऱ्यांनी सांगितले.

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा ठरत आहे. पनवेलपासून पोलादपूरपर्यंतच्या तीन तासांच्या प्रवासाला सहा ते सात तास लागत असून रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविताना वाहनचालकाला मोठी कसरत करावी लागत आहे. सकाळी घरून निघालेली व्यक्ती वेळेत पोहोचणे सोडाच पण सुखरूप पोहचेल का? हाच प्रश्न घरच्या कुटुंबाला पडतो.

बुधवारी पनवेल ते वडखळपर्यंत ट्रॅफिक जाम झाल्याने येणाऱ्या एसटी बस पोलादपूर स्थानकात उशिरा पोहचत होत्या. पनवेल ते इंदापूर बसस्थानकात खड्डे असल्याने एसटीने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना धक्के सहन करत प्रवास करावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया एसटी वाहनचालक पोसे यांनी दिली. एक खड्डा चुकविताना दुसरा खड्डा समोर के व्हा येतो हे समजत नाही. त्यामुळे गाड्यांना अपघात होण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविले गेले नाही तर या रस्त्याने वाहन चालविणे कठीण होईल, अशी भीती खाजगी वाहनचालकांनी व्यक्त केली. तर एसटीने प्रवास करणाऱ्या मोरे नामक व्यक्तीने बसमधून प्रवास करताना आपण होडीतून तर चाललो नाही ना? असा प्रश्न पडतो, अशी प्रतिक्रिया दिली. यामुळे गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

(विशेष प्रतिनिधी)

Web Title: The pothole hit government work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.