खोपोलीत भरलेले खड्डे गेले वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 06:07 AM2017-08-11T06:07:24+5:302017-08-11T06:07:24+5:30
खोपोली नगरपालिका हद्दीतील सर्व रस्त्यांची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी शहराच्या सर्वच भागांची अवस्था झाली आहे.
वावोशी : खोपोली नगरपालिका हद्दीतील सर्व रस्त्यांची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी शहराच्या सर्वच भागांची अवस्था झाली आहे. शहराच्या सर्वच भागात पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या डांबरीकरणाची बिकटावस्था आहे. अंदाजे ६५ लाख रुपये खर्च करून डांबरीकरणाचे पॅचेस मारण्यात आले होते. तर काही भागात रस्त्याचे डांबरीकरणसाठी २ कोटी खर्च करण्यात आले. पण निकृष्ट डांबरीकरणामुळे सर्वच रस्त्यांवर महाकाय खड्डे पडले तर अनेक भागात खडी रस्त्यावर डोकावते आहे. यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत इतर विषयांवर आक्रमकता दाखविणाºया लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत आक्र मकता दाखविली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ठेकेदाराक डून काम निकृ ष्ट करण्यात आले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, मागील वर्षी लव्हेज गावात नव्यानेच डांबरीकरणाचे काम करण्यात आले पण त्या संपूर्ण रस्त्याचे डांबर वाहून गेले आहे.
अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनांचे अपघात होत आहे. लव्हेज शाळेसमोर महाकाय खड्डा पडल्याने वाहनांचे अपघात होत आहेत तसेच अनेक विद्यार्थी या खड्ड्यात पडल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. अशा ठेकेदारांवर लोकप्रतिनिधींनी जागृत राहून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.
गणेशोत्सवापूर्वी खोपोली शहरातील खड्डे बुजविण्यात येतील. सध्या खड्डे भरण्याचे काम सुरु आहे.
- संजय शिंदे,
मुख्याधिकारी, खोपोली