कशेडी घाटात महामार्गावर खड्डे; अपघातांचा धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 01:05 AM2020-06-18T01:05:15+5:302020-06-18T01:05:20+5:30
वाहतुकीचा वेग मंदावला; वाहनचालकांची कसरत
पोलादपूर : मुंबई- गोवा महामार्गाचे काम वेगाने चालू असले, तरी महामार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. खड्ड्यांमधून खडी वर येऊन सर्वत्र पसरली आहे. त्यातच पावसामुळे खड्ड्यांत पाणी साचल्याने अनेक गाड्या खड्ड्यांत आदळत असून, वाहनचालकांसह प्रवाशांनाही गचके सहन करावे लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाच्या कामामुळे धामणदेवी गावातील महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, पावसाच्या पाण्याने खड्डे भरल्याने एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या खड्ड्यांमुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला असून, वाहतूक संथ गतीने होताना दिसून येत आहे.
घाट माथ्यावर पावसाचे प्रमाण जास्त असल्याने वाहनाचा वेगही मंदावत आहे. त्यातच रस्त्यांवर ठिकठिकाणी काम सुरू असल्याने, वाहतुकीला ब्रेक लागत आहे, तसेच दरवर्षीप्रमाणे अनेकदा अनेक मालवाहतूक करणारी मोठी वाहने दरीलगत किंवा महामार्गालगत स्लिप होत पलटी होत असतात. नुकताच कशेडी घाट परिसरात चिपळूणकडे जाणारा कंटेनर स्लिप झाल्याने अपघात झाला होता.
महामार्गाच्या कामामुळे माती, डांबर, दगडांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असून, अनेकदा खड्ड्यांत वाहने आदळून खड्ड्यांतील खडी इतर ठिकाणी पसरत असल्याने, भविष्यात दुचाकीस्वार स्लिप होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महामार्ग विभागाने लावले बॉरिके ट्स
च्कशेडी घाटातील भोगाव हद्दीत सुमारे ९० ते १०० फूट खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात दरम्यान पूर्ण झाली. मात्र, काही ठिकाणी काम झालेले नाही. या ठिकाणी अपघातांचा धोका लक्षात घेऊन महामार्ग विभागाकडून लोखंडी बॅरिकेट्स लावून ठेवले आहेत.
च्पावसाळ्यात येथे पडलेल्या या खड्ड्यांमध्ये पाणी साचून ते इतर वाहनांमुळे दुचाकीस्वारांच्या अंगावर उडून दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.