महिनाभरापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या ४७ कोटी खर्चाच्या उड्डाणपुलावर महिन्याभरातच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2023 07:04 PM2023-09-15T19:04:46+5:302023-09-15T19:05:03+5:30
या पुलाच्या कामाच्या दर्जा बाबत नागरिकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहेत.
मधुकर ठाकूर
उरण : मागील महिन्यातच मोठा गाजावाजा करत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या आणि वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या ४७ कोटी खर्चाच्या चिर्ले-दास्तान उड्डाण पुलावर महिन्याभरातच खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. यामुळे या पुलाच्या कामाच्या दर्जा बाबत नागरिकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहेत.
दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वाहतूक कोंडीतून सुटका करणारा उरण पुर्व विभागातील नागरिकांसाठी हा उड्डाणपुल वाहतुकीसाठी महत्वाचा आहे. मुंबई, ठाणे, नवीमुंबई, पनवेल आणि उरणला जाण्यासाठी हा मार्ग पुर्व भागातील नागरिकांना सोयीचा आहे.त्याशिवाय २० मिनिटांच्या अंतराने जेएनपीए बंदरातुन धावणाऱ्या मालगाड्यांमुळे रेल्वे फाटक बंद करण्यात येत होते.त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत होता.या वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी चिर्ले ते दास्तान पर्यंत दिड किमी लांबीचा उड्डाण पुल उभारण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठाणे खाडी पुल विभागातर्फे हे काम करण्यात आले आहे.हा उड्डाणपूल उभारण्यावर सुमारे ४७ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.
नुकतेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते या पुलाचे उदघाटन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित असलेल्या बांधकाम मंत्र्यासह खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर आणि स्थानिक आमदार महेश बालदी यांनी यावेळी ठेकेदाराच्या कामाबाबत चांगलीच स्तुती सुमने उधळण्यात आली होती. मात्र महिनाभरातच या पुलाला खड्डे पडू लागल्यामुळे कामाच्या दर्जा बद्दल शंका व्यक्त केली जात आहे. अगोदरच या पुलाच्या रस्त्याची कुठेही लेव्हल नाही. त्यामुळे या पुलावर खड्डे पडले आहेत. तसेच याआधी गर्डर उचलून बसवतानाही कोसळला होता. या उड्डाणपूलाच्या देखभाल, दुरूस्तीचा कालावधी १० वर्षाचा असल्याने जर पुलाच्या कामाला काही झाले तर ठेकेदाराकडून तो दुरूस्त करून घेण्यात येईल. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही अशी प्रतिक्रिया संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.