कर्जत नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 12:03 AM2019-01-29T00:03:11+5:302019-01-29T00:04:04+5:30

दहा वर्षांच्या वर्चस्वाला धक्का; थेट नगराध्यक्षपदी सुवर्णा जोशी; महायुतीचा १० तर राष्ट्रवादीचा आठ जागांवर विजय

The power of Mahayuti on the Karjat Municipal Council | कर्जत नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता

कर्जत नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता

googlenewsNext

कर्जत नगरपरिषदेवर शिवसेना-भाजपा-आरपीआय यांच्या महायुतीने बाजी मारली असून त्यांचे १० उमेदवार विजयी झाले. तर राष्ट्रवादी आघाडीचे आठ उमेदवार निवडून आले आहेत. थेट नगराध्यक्ष पदावर शिवसेनेच्या सुवर्णा जोशी या महायुतीच्या उमेदवार विजयी झाल्या. आमदार सुरेश लाड राहत असलेल्या प्रभागात युतीने दोन्ही जागा जिंकल्या. कर्जत नगरपरिषद निवडणुकीत २७ जानेवारी रोजी ७६.३१ टक्के मतदान झाले होते. मतमोजणी २८ जानेवारी रोजी सोमवारी कर्जत शहरातील अभिनव प्रशालेत घेण्यात आली. मतमोजणीसाठी नऊ टेबल लावण्यात आले होते, तर निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बोंबले आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रामदास कोकरे यांनी निवडणूक आयोगाने निरीक्षक रायगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी शितोळे यांच्या उपस्थितीत मतमोजणीस सुरु वात केली. त्यात निवडणुकीत निकाल निश्चित झाले.

नेरळ/कर्जत : नगरपरिषदेच्या स्थापनेला २७ वर्षे पूर्ण झाली. नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर प्रथम कर्जत नगरपरिषदेवर भगवा फडकला आहे. कर्जत तालुक्यात पूर्वी काँग्रेस आणि शिवसेनेचे वर्चस्व होते. १९९२ मध्ये ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदमध्ये झाले. सुरवातीस नगरपरिषदेवर काँग्रेसची सत्ता होती नंतर सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश लाड कर्जत विधानसभा मतदार संघात तीन टर्म आमदार आहेत त्यामुळे नगरपरिषदेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ठेवण्यास ते नेहमीच यशस्वी झाले. २०१४ च्या नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना- भाजपा - आरपीआय यांनी महायुती करून राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिले होते. मात्र त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवून सत्ता काबीज केली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे १० संख्याबळ होते तर शिवसेना - भाजपा - आरपीआय युतीचे संख्याबळ ८ होते. म्हणजे मागील निवडणुकीतच युतीच्या हातातून थोडक्यात सत्ता गेली होती.
२०१९ च्या निवडणुकीत कोणत्याही भावात नगरपरिषदेवर भगवा फडकायचा हेच ध्येय बाळगून शिवसेनेने भाजपा -आरपीआयला बरोबर घेऊन महायुती केली. या वेळी नगराध्यक्ष पदाची थेट निवडणूक होती. शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा जोशी यांनी आरक्षण पडल्यापासूनच तयारी सुरू केली होती. त्या विद्यमान नगरसेविका असल्याने त्यांची ओळख होती. शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा जोशी यांचे नाव रेसमध्ये होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडे तेवढ्या तोडीच्या उमेदवाराचे नाव समोर येत नव्हते. अखेर वरिष्ठ आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आमदार सुरेश लाड यांनी आपली कन्या प्रतीक्षा लाड हिला निवडणुकीच्या मैदानात उतरवले.

कर्जत विधानसभा मतदार संघाचे आमदार सुरेश लाड हे प्रतिनिधित्व करतात त्यामुळे त्यांची तालुक्यात ताकद आहे. मात्र जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर ही ताकद कमी होत असल्याचे जाणवले. तालुक्यात पहिल्यांदा पंचायत समितीमध्ये शिवसेनेने आपला भगवा फडकवून आमदार लाड यांना शह दिला. आता नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने महायुती करून नगरपरिषदेवर २७ वर्षांनंतर पहिल्यांदा भगवा फडकवला. राजकारणात एक मुरलेले नेतृत्व म्हणून आमदार लाड यांची ओळख आहे. नगरपरिषद निवडणुकीत लाड आडनावाचे चार उमेदवार उभे होते.

नगरपरिषद निवडणुकीपूर्वी शिवसेनेने बाजारपेठेबाहेर दहिवली, आकुर्ले, मुद्रे, भिसेगाव, गुंडगे या परिसरात पाय रोवले होते. ज्या दहिवलीमधील प्रभागावर आमदार लाड यांची मदार असायची आज त्या प्रभागामधून राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान कमी झाले असल्याचे समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जत नगरपरिषदेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत आमदार लाड यांची कन्या प्रतीक्षा लाड हिचा पराभव आणि नगरपरिषदेवर सत्ता परिवर्तन झाल्याने आता नक्कीच विरोधकांचे मनोधैर्य वाढले आहे. प्रतीक्षा लाड यांचा पराभव व सत्ता परिवर्तन याबाबत आमदार लाड व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चिंतन करायला भाग पाडेल.

प्रभाग सहामध्ये दोन विद्यमान नगरसेवक पुन्हा निवडून आले असून हा प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने जिंकला. शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार असून देखील महायुतीला या प्रभागात विजय मिळविता आला नाही. विद्यमान नगरसेवक पुष्पा दगडे आणि सोमनाथ पालकर विजयी झाले असताना सेनेच्या यमुताई विचारे यांना सलग तिसऱ्यांदा निवडून आल्या नाहीत.

प्रभाग सातमध्ये सेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये महायुतीच्याएका उमेदवाराचा पराभव झाला असून आरपीआयचे तालुका अध्यक्ष राहुल डाळिंबकर हे विजयी झाले. याच प्रभागात विजयी झालेल्या राष्ट्रवादीच्या मधुरा चंदन यांना १४१४ मते मिळाली, त्या कर्जत नगरपरिषद निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या उमेदवार ठरल्या आहेत.

प्रभाग आठमध्ये महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी झाले असून तेथे माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे राजेश लाड यांचा पराभव झाला. तर विरोधी पक्षनेते अशोक ओसवाल हे पुन्हा विजयी झाले. त्या प्रभागात भाजपाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. तर प्रभाग नऊमध्ये विद्यमान उपनगराध्यक्ष उमेश गायकवाड यांनी विजय मिळविला,मात्र तेथे राष्ट्रवादी आघाडीमधील दुसºया उमेदवाराचा पराभव झाला.

प्र.१मध्ये राष्ट्रवादी विजयी
नगरपरिषद निवडणुकीच्या प्रभाग एकमध्ये शिवसेनेत बंडखोरी झाल्याने त्या ठिकाणी दोन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले असून विद्यमान शिवसेनेच्या नगरसेविका अरु णा वायकर यांना तेथे पराभव स्वीकारावा लागला. प्रभाग दोनमध्ये शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे यांचे भाचे तेजस भासे यांनी माजी नगराध्यक्ष शरद लाड यांच्या समोर उभे केलेले आव्हान लाड यांनी मोडून काढत पालिकेत पाच वर्र्षांनी पुन्हा प्रवेश केला. प्रभाग तीनमध्ये तालुक्याचे आमदार राष्ट्रवादीचे सुरेश लाड यांचे निवासस्थान असलेल्या प्रभागात महायुतीने विजय मिळविला. तेथे मोठ्या प्रमाणात झालेले मतदान राष्ट्रवादीच्या पराभवास कारणीभूत ठरले. प्रभाग चार या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात प्रथमच शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले असून तेथून निवडून आलेले नितीन सावंत यांनी सलग तिसºयांदा विजय मिळविला आहे. प्रभाग पाचमध्ये महायुतीने मोठा विजय मिळविला असून विद्यमान नगरसेवक संतोष पाटील यांच्या पत्नी विजयी झाल्या असून भाजपाचे माजी नगरसेवक बळवंत घुमरे यांचा विजय झाला आहे.

Web Title: The power of Mahayuti on the Karjat Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.