माणगाव तालुक्यात वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 11:57 PM2020-06-05T23:57:43+5:302020-06-05T23:57:49+5:30
अनेक ठिकाणी अजून नळाला पाणी आलेले नाही. प्रत्येक जण आपल्या घरातील छप्पर दुरुस्ती करण्यात व्यस्त असल्याचे चित्र ठीकठिकाणी पाहावयास मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
माणगाव : चक्रीवादळाने तालुक्यातील घरोघरी नुकसान झाले आहे. इमारतीमध्ये राहणाऱ्या सर्व सोसायट्यांमधील शेड उडून गेल्या आहेत. कौलारू घरांची कौले फु टल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर वीजपुरवठा दोन दिवसांनंतरही सुरळीत झालेला नाही.
अनेक ठिकाणी अजून नळाला पाणी आलेले नाही. प्रत्येक जण आपल्या घरातील छप्पर दुरुस्ती करण्यात व्यस्त असल्याचे चित्र ठीकठिकाणी पाहावयास मिळाले. कोणी प्लास्टीक आणून टाकत आहे तर कोणी आपले कौलरू घर दुरुस्ती करण्यास लागलेला दिसत आहे. सकाळीच खेडोपाड्यांतील नागरिक रस्ते बंद असल्याने पायपीट करीत बाजारात घरदुरुस्ती व छप्परदुरुस्तीच्या वस्तू घेण्यास आलेले दिसले.
माणगाव तालुक्यात सर्वत्र विजेचे खांब, वीजवाहिन्या रस्त्यावर पडलेल्या दिसून आल्या. वीज नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. माणगाव तालुक्यात घरोघरी नुकसान झाल्याने महसूल विभागाला पंचनामे करण्यास वेळ जाणार आहे, त्यामुळे प्रशासनाने आपली घरे दुरुस्ती करून घ्यावी, असे सांगितले आहे. त्याचा फोटो व व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये काढून ठेवावे जेणेकरून पंचनामाकरिता दाखविता येईल.
वाढीव दराने पत्र्यांची विक्री
माणगाव तालुक्यात घर दुरुस्तीकरिता लागणाºया वस्तू त्यात सिमेंट पत्रे, लोखंडी पत्रे, कौले, कोणे, ढापे व प्लास्टीक हे लोकांची गरज पाहता अवाजवी दर लाऊन विकले जात आहे. यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गोरेगाव शहरातील तरुणांनी स्वत: वेळ देऊन ग्रामपंचायत प्रशासनाच्या साहाय्याने रस्त्यावर पडलेली झाडे दूर केली.