जिल्हा परिषदेवर शेकाप-राष्ट्रवादीची सत्ता

By Admin | Published: February 24, 2017 07:58 AM2017-02-24T07:58:03+5:302017-02-24T07:58:03+5:30

अत्यंत अटीतटीच्या रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या

The power of the SHEKAP-NCP on the Zilla Parishad | जिल्हा परिषदेवर शेकाप-राष्ट्रवादीची सत्ता

जिल्हा परिषदेवर शेकाप-राष्ट्रवादीची सत्ता

googlenewsNext

अलिबाग : अत्यंत अटीतटीच्या रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ५९ जागांकरिता तर जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांमधील ११८ जागांकरिता झालेल्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी झाली. प्राप्त निकालानुसार जिल्हा परिषदेत शेकाप-राष्ट्रवादी युतीने निर्विवाद सत्ता काबीज करुन, सेना-काँग्रेस युती आणि भाजपा यांना विरोधी पक्षात बसण्यास भाग पाडले आहे.
अलिबाग तालुक्यातील ७ जागांची मतमोजणी संध्याकाळी उशिरापर्यंत सुरु होती. उपलब्ध आकडेवारीनुसार ५९ पैकी २२ जागा शेकापने तर १२ जागा राष्ट्रवादीने काबीज करुन ३४ जागांच्या जोरावर सत्ता काबीज केली आहे. शिवसेनेने १८ जागांवर विजय मिळवला. काँग्रेस आणि भाजपाला केवळ तीन-तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
आ. सुनील तटकरे आणि शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेऊन खेळलेली राजकीय खेळी यशस्वी झाली असली तरी मागच्या वेळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० जागांमध्ये घट होवून यावेळी १२ झाल्या आहेत. मात्र शेकापच्या मागच्या वेळच्या १९ जागांमध्ये वाढ होवून त्या २३ झाल्या आहेत. परिणामी शेकापला ही युती पथ्यावर पडली आहे.
सेना-भाजपा युतीमध्ये फूट पडल्यावर सेना-काँग्रेस युती जिल्ह्यात जन्माला आली, परंतु त्यांना अपेक्षित यश प्राप्त झाले नाही. शिवसेनेच्या गतवेळच्या १५ जागांमध्ये वाढ होऊन त्या १८ वर पोहोचल्या, मात्र काँग्रेसच्या मागील ७ जागांमध्ये घट होऊन काँग्रेसला केवळ ३ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. भाजपाची केवळ एक जागा होती, त्यात वाढ होऊन भाजपाने तीन जागी यश संपादन केले आहे. पनवेल मधील जिल्हा परिषदेच्या ८ जागांपैकी ६ जागी शेकापने विजय मिळविला आहे, तर भाजपाला केवळ २ जागा मिळाल्या. भाजपा जिल्हाध्यक्ष आ.प्रशांत ठाकूर यांना अपेक्षित यश प्राप्त झाले
नाही.
कर्जतमध्ये ६ जागांपैकी प्रत्येकी एक काँग्रेस व शिवसेनेने तर प्रत्येकी दोन शेकाप आणि राष्ट्रवादीने मिळविल्या. राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांचे हे अपयश मानले जात
आहे.
खालापूरमध्ये ४ पैकी तीन जागी राष्ट्रवादीने तर एका जागी शिवसेनेने यश मिळविले आहे. उरणमध्ये ४ पैकी दोन जागी काँग्रेसने तर प्रत्येकी एक जागी शिवसेना व भाजपाने यश मिळविले आहे. पेणमध्ये काँग्रेसचे माजीमंत्री रविंद्र पाटील यांना मोठे अपयश आले आहे. पेणमधील पाच पैकी पाच जागा काबीज करुन शेकापचे आमदार धैर्यशील पाटील यांनी काँग्रेसचा पराभव केला.
पाली-सुधागडमध्ये दोन जागांपैकी प्रत्येकी एक शेकाप आणि शिवसेनेने काबीज केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांच्या कन्या गीता पासरेचा येथे पराभूत झाल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का आहे. मुरुडमध्ये दोनपैकी प्रत्येकी एक जागा शेकाप व शिवसेनेने काबीज केली आहे.
माणगावमध्ये ४ पैकी ३ शिवसेनेने तर एक शेकापने पटकावली आहे. पोलादपूरमध्ये २ पैकी प्रत्येकी एक जागा शिवसेना व शेकापने पटकावली आहे. रोह्यात ४ पैकी २ राष्ट्रवादी तर प्रत्येकी १ जागी सेना व शेकापने यश मिळवले आहे. महाडमध्ये काँग्रेसला मोठे अपयश पत्करावे लागले आहे, ५ पैकी ५ जागा सेनेने काबीज केल्या आहेत.
म्हसळा तालुक्यात २ पैकी २ जागा राष्ट्रवादीने तर श्रीवर्धनमधील २ पैकी प्रत्येकी एक राष्ट्रवादी व सेनेने काबीज केल्या आहेत. तळा तालुक्यातील २ पैकी दोन जागा राष्ट्रवादीने पटकावल्या आहेत. अलिबागमधील ७ जागांपैकी ४ जागी शेकाप तर २ जागी शिवसेनेने विजय संपादन केला असून १ जागेची मोजणी उशिरापर्यंत सुरू होती.
(विशेष प्रतिनिधी)

सुधागडात आघाडी, युतीला समान यश

पाली : सुधागड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना महायुतीचा जिल्हा परिषदेत एका जागेवर, तर पंचायत समितीच्या दोन जागांवरील उमेदवार निवडून आले. तर शेकाप-राष्ट्रवादी या आघाडीचादेखील जिल्हा परिषदेच्या एक व पंचायत समितीच्या दोन जागांवर विजय झाला आहे. यामुळे तालुक्यात युती व आघाडीला समसमान जागेवर समाधान मानावे लागले.
पाली जि.प गटातून आघाडीचे उमेदवार सुरेश खैरे विजयी झाले. तर जांभूळपाडा गटातून महायुतीचे रवींद्र देशमुख विजयी झाले.
पाली पं.स. गणातून आघाडीच्या सविता हंंबीर, परळी युतीच्या उज्ज्वला देसाई, जांभूळपाड्यात युतीचे रमेश सुतार, नाडसूर आघाडीच्या साक्षी दिघे विजयी.


कर्जतमध्ये जिल्हा परिषदेत आघाडीची बाजी

कर्जत : तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-शेतकरी कामगार पक्ष-स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आघाडीने जिल्हा परिषदेच्या सहा जागांपैकी चार जागा जिंकल्या तर पंचायत समितीच्या बारा जागांपैकी सात जागा शिवसेनेने जिंकून पुन्हा एकदा तालुक्यातील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
भारतीय जनता पक्षाने आरपीआयबरोबर युती केली, परंतु त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. उलट त्यांच्या बहुतांश उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या.
शिवसेनेने एक जिल्हा परिषदेची जागा जिंकून आपले अस्तित्व टिकविले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत २,१०६ आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत १,४९० अशी एकूण ३,५९६ मते नोटाला पडली.
या निवडणुकीत पंचायत समितीचे उपसभापती मनोहर थोरवे यांना पराभव पत्करावा लागला. त्यांचा राष्ट्रवादीचे नवखे उमेदवार सुधाकर घारे यांनी ७१७ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत १९९९ चा राष्ट्रवादी - शेकाप आघाडीचा पॅटर्न जिल्हा परिषदेत यशस्वी ठरला.
येथील साईकृपा शेळके बंधू मंगल कार्यालयाच्या सभागृहात सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू झाली. संपूर्ण मतमोजणी दुपारी तीन वाजेपर्यंत पूर्ण झाली. मतमोजणीचे काम निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भडकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कोष्टी यांनी त्यांना सहकार्य केले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस - शेतकरी कामगार पक्ष- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या आघाडीला कळंब, पाथरज, उमरोली आणि बीड बुद्रुक या चार जागांवर बाजी मारली तर नेरळ आणि सावेळे या जागा शिवसेना-काँग्रेस युतीने पटकावल्या.
कर्जत पंचायत समितीतील १२ पंचायत समिती निर्वाचन गणामध्ये पोशीर, दहिवली तर्फे वरेडी, उमरोली, नेरळ, पिंपळोली, सावेळे आणि वेणगाव या सात जागांवर विजय मिळवून पंचायत समितीची सत्ता काबीज केली.
आघाडीला कळंब, पाथरज, कशेळे, शेलू, बीड बुद्रुक या जागांवर समाधान मानावे लागले. तर भारतीय जनता पार्टी व आरपीआय युतीला एकही जागा मिळविण्यात यश आले नाही. त्यांच्या बहुतांश उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या.


सेनेचा बालेकिल्ला ढासळला
च्पोलादपूर : तालुक्यातील दोन जिल्हा परिषदांपैकी लोहारे गटात राजिपचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांचा, लोहारे गणातील यशवंत कासार यांचा विजय वगळता शिवसेनेने आपले पारंपरिक मतदार संघ गमावले. गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता असणाऱ्या देवळे गटात व देवळे आणि गोवेळे गणात शिवसेनेचा निसटता पराभव झाल्याने शिवसेनेचा अनेक वर्षांचा हा बालेकिल्ला ढासळला.
च्देवळे गटातील काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप युतीचे उमेदवार सुमन कुंभार विजयी झाल्या, त्यांना ६११८ मते मिळाली. लोहारे गटातील चंद्रकांत कळंबे विजयी झाले, त्यांना ५६७९ मते मिळाली. देवळे गणात काँग्रेस-शेकाप-राष्ट्रवादी युतीचे शैलेश सलागरे विजयी झाले, त्यांना २९४६ मते मिळाली. गोवेळे गणात काँग्रेस-शेकाप-राष्ट्रवादी युतीच्या नंदा चांदे विजयी झाल्या, त्यांना २८९१ एवढी मते मिळाली. कोंढवी पंचायत समिती गणात काँग्रेसच्या दीपिका दरेकर विजयी झाल्या, त्यांना २६३३ एवढी मते मिळाली. लोहारे गणात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी शिवसेनेचे कासार विजयी झाले, त्यांना ३०५८ मते मिळाली.

तळा तालुक्यात राष्ट्रवादी
च्तळा : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायत समितीच्या चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद बहुमत प्राप्त केले असून, तळा पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. तळा तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
च्महागाव जिल्हा परिषद गटात गीता जाधव यांनी विजय मिळविला, तर मांदाड गटात बबन चाचले यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महागाव पंचायत समिती गणात अक्षरा कदम, काकडशेत गणातून रवींद्र नटे १४६३ मतांनी विजयी झाले. रहाटाड गणामध्ये देवकी लासे, तर मांदाड गणातून गणेश वाघमारे विजयी झाले. अशा प्रकारे तळा तालुक्यात राष्ट्रवादीच्या सर्व जागांवर विजय मिळाला असून, जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायत समितीच्या चार जागांवर यश प्राप्त केले असून, तळा पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून पूर्वीप्रमाणेच सत्ता राखण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी झाली आहे. विजयाबद्दल प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी उमेदवारांचे अभिनंदन केले.

Web Title: The power of the SHEKAP-NCP on the Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.