बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी येथे मंगळवारी नरक चतुर्दशीच्या दिवशीच पहाटे अभ्यंग स्नानाची गडबड सुरू असतानाच चार वाजण्याच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाला. २२ हजार के व्ही व्होल्ट या उच्च दाबाच्या लाइनचे दोन विद्युत पोल खाली पडल्याने बिरवाडीसह ८० गावांचा विद्युत पुरवठा ऐन दिवाळीमध्ये खंडित झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.महाड तालुक्यातील बिरवाडी येथे मंगळवारी (१० नोव्हेंबर) पहाटे २२ हजार के व्ही होल्टचे दोन विद्युत पोल रस्त्यावर वाकल्याने येथील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. या घटनेनंतर बिरवाडीमधून येणारी एसटी सेवा बंद पडली आहे. दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत रस्त्यावरील पोल बाजूला करुन तसेच विद्युत तारा बाजूला केल्यानंतर एसटीची बस सेवा सुरळीत करुन बिरवाडीचा मुख्य रस्ता वाहतुकीकरिता खुला केला होता. मात्र सकाळी रस्ता बंद असल्याने नागरिकांची धांदल उडाली.ऐन दिवाळीत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पडलेले विद्युत पोल लवकरात लवकर दुरु स्त करण्यासाठी महावितरण कंपनीचे १२ - १२ कर्मचाऱ्यांच्या दोन तुकड्यांसह एकूण ३० कर्मचारी युध्दपातळीवर काम करीत आहेत. सायंकाळी ६ वाजेपर्यंत बिरवाडीसह ८० गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत झाला असल्याची माहिती महाड येथील महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता महेंद्र वाकपैजण यांनी दिली. या घटनेची माहिती बिरवाडीचे मंडळ अधिकारी बी. डी. जाधव यांनी महाडचे तहसीलदार संदीप कदम यांना देताच संदीप कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. बिरवाडी परिसरात जुने विद्युत पोल बदलण्याची मागणी बिरवाडी ग्रामपंचायत तसेच नागरिकांनी लेखी निवेदनाद्वारे वारंवार विद्युत वितरण कंपनीकडे केली आहे. (वार्ताहर)ऐन दिवाळीत अशा प्रकारे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सकाळची सर्वच कामे रखडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच बस सेवा बंद असल्याने नागरिकांची तारांबळ झाली. बिरवाडी परिसरात जुने विद्युत पोल बदलण्याची मागणी बिरवाडी ग्रामपंचायत तसेच नागरिकांनी लेखी निवेदनाद्वारे वारंवार विद्युत वितरण कंपनीकडे केली आहे. मात्र नागरिकांच्या मागणीची योग्य ती दखल घेऊन कारवाई केली नाही, तेव्हा आता तरी या मागणीचा गांभीर्याने विचार करावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
८० गावांचा वीजपुरवठा खंडित
By admin | Published: November 11, 2015 12:20 AM