१९८२ साली उभारलेल्या वीज यंत्रणेत अद्याप सुधारणा नाही; जीवावर बेतण्याची स्थानिकांना भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 12:04 PM2022-01-11T12:04:51+5:302022-01-11T12:05:06+5:30
रायगड जिल्हाच्या उत्तरेस, कर्जत तालुक्यातील पाषाणे ते कळंब व पोशीर गावांच्या परिसरात एकूण ४ ग्रुपग्रामपंचायती आहेत . या ४ ग्रुप ग्रामपंचायतीत एकूण ८ ते ९ हजारावर घरं आहेत, जिथे ४० ते ५० हजारावर लोकवस्ती असलेली गावे आहेत .
मुंबई : रायगड मधील कर्जत तालुक्यात असलेल्या पाषाणे ते कळंब या ४ ग्रुप ग्रामपंचायतिच्या परिसरात सातत्याने विज पुरवठा खंडित होत असून, तक्रार करुनही अद्याप कुठलीही उपाययोजना नाही, म्हणून त्वरित लक्ष घालून उपाययोजना शासनाने करावी अशी मागणी करणारं पत्र युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष उत्तम पालांडे यांनी थेट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि विद्युत पुरवठा मंत्री नितीन राऊत यांना दिलं आहे .
रायगड जिल्हाच्या उत्तरेस, कर्जत तालुक्यातील पाषाणे ते कळंब व पोशीर गावांच्या परिसरात एकूण ४ ग्रुपग्रामपंचायती आहेत . या ४ ग्रुप ग्रामपंचायतीत एकूण ८ ते ९ हजारावर घरं आहेत, जिथे ४० ते ५० हजारावर लोकवस्ती असलेली गावे आहेत . या गावामध्ये गेल्या काही वर्षात विकासकामं जोरदार सुरू असून बरीच गावं शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करतायत. पण विकासकामे होऊनही वर्षानुवर्षे सुरू असलेला विजेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
या ग्रुप ग्रामपंचायतींच्या हद्दीत वीज वारंवार खंडित होणे , जिल्ह्यातील इतर भागापेक्षा अधिक भारनियमन लागू करणे ,पावसाळ्यात विजेचे पोल कोसळून काही दिवसांसाठी वीज पूर्णतः खंडित होणे, विज गेली की पुन्हा कधी येईल याबाबत कुठलाही संदेश मोबाईल वर येत नाही, विजेचे पोल रस्ताच्या बाजूला झुकलेले आहेत . त्यामुळे कुठलीही दुर्घटना होऊ शकते ,जर योग्य वेळी लक्ष घातले नाही तर, भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही .विजेच्या वारंवार खंडित होण्यामुळे आणि भारनियमन लागू केल्यामुळे परिसरातील नागरिक/ग्रामस्थ बेजार झाले आहेत. यावर ठोस उपाययोजना आता सर्व गावातील ग्रामस्थांना अपेक्षित आहेत .
१९८२ सालीची वीज यंत्रणा अद्याप बदलली नाही
या परिसरात १९८२ साली विज येऊन पहिला दिवा पेटला होता . पण तेव्हा गावांमध्ये वीज पोहचवण्यासाठी उभारलेल्या यंत्रणेच्या श्रेणीत सुधारणा त्यानंतर अद्याप हवी तशी झालेली नाही . गावांमध्ये लोकसंख्या वाढू लागलीय , विकास कामं होत असल्यामुळे ५-७ मजली इमारती उभ्या राहून गावांच शहरात रूपांतर होतंय . पण विजेची यंत्रणा मात्र आहे त्याच स्थितीत स्थिरावलीय. ती आता श्रेणीसुधारित करण्याची गरज आहे .
ग्रुपग्रामपंचायत परिसरातील असणारी गावे
पाषाणे,खाड्याचापाडा,आरडे,आसे, माला, खडकवाडी, खरोडावाडी,फराटपाडा,सालोखं, कळंब, मानिवली,पोशीर, चिकणपाडा, देवपाड, परिसर