प्रभू श्रीराम स्वगृही विराजमान झाले, कारसेवक किशोर जैन यांची प्रतिक्रिया
By राजेश भोस्तेकर | Published: January 22, 2024 03:44 PM2024-01-22T15:44:12+5:302024-01-22T15:44:37+5:30
आयोध्येत रामललाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे. हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
अलिबाग : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने बाबरी मशीद पाडण्याचे आदेश दिल्यानंतर युपी राज्यात दाखल झालो मात्र मुलायम सिह यांच्या सरकारने कारसेवक यांना पकडून बंदिवान केले होते. १३ दिवस जेलमध्ये ठेवले त्यानंतर सोडून दिले. २२ जानेवारी रोजी आयोध्येत रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. अशी प्रतिक्रिया नागोठणे येथील ठाकरे गटाचे नेते किशोर जैन यांनी दिली आहे.
१९९० साली आयोध्यातील बाबरी मशीद पाडण्यासाठी नागोठणे येथून १६ ते १७ जण ट्रेनने युपी मध्ये पोहचलो. यावेळी जिल्ह्यातून साडे तीनशे शिवसैनिक हे दाखल झाले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश मानून आम्ही कार सेवक म्हणून गेलो होतो. त्यावेळी जैन हे २५ वर्षाचे होते. बाबरी मशीद प्रकरण हे चांगलेच तापले होते. अशावेळी मुलायम सिंह यांचे सरकार युपीत होते. येणाऱ्या कार सेवक यांना अटक करण्याचे फर्मान मुख्यमंत्री मुलायम सिंह यांनी दिले होते.
युपी येथे पोहचल्यानंतर आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर उरई येथील जेलमध्ये ठेवण्यात आले. त्यावेळी अनेक कार सेवक आमच्या सोबत होते. दोन तीन दिवस जवळचे असलेले पदार्थ खाऊन दिवस काढले. मात्र मुलायम सरकारने कोणतीही खाण्या पिण्याची व्यवस्था केलेली नव्हती. अखेर एक दिवस जेलच्या भिंतीवरून उडी टाकून बाहेर असलेल्यांना जेवणाबाबत माहिती दिली. त्यानंतर तेथील गावकऱ्यांनी तांदूळ, भाजी, डाळ जेलमध्ये दिले. जेलमध्ये जेवण करून तेरा दिवस काढले. त्यानंतर युपी सरकारने सोडून दिले. मात्र बाबरी येथे जाण्यास बंदी केल्याने आम्हाला माघारी फिरावे लागले. असे किशोर जैन यांनी माहिती दिली.
कार सेवक म्हणून आम्हाला अभिमान आहे. कार सेवकाच्या त्यागामुळे सोमवारी २२ जानेवारी रोजी अयोध्या मध्ये श्री राम मूर्तीची प्राण प्रतिष्ठान करण्यात आली. ५०० वर्षाने श्रीराम हे स्वगृहात विराजमान झाले. याचा आम्हा कार सेवकांना अत्यानंद आहे. अशी प्रतिक्रिया किशोर जैन यांनी दिली आहे.