मोराचे वाचवले प्राण
By Admin | Published: June 30, 2017 02:54 AM2017-06-30T02:54:31+5:302017-06-30T02:54:31+5:30
माथेरान येथे राष्ट्रीय पक्षी मोर कित्तेक वर्षे वास्तव्याला आहेत. या मोरांच्या कळपातील एका मोराला उडता येत नव्हते. त्याचप्रमाणे त्याच्या उजव्या पायाला सूज आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : माथेरान येथे राष्ट्रीय पक्षी मोर कित्तेक वर्षे वास्तव्याला आहेत. या मोरांच्या कळपातील एका मोराला उडता येत नव्हते. त्याचप्रमाणे त्याच्या उजव्या पायाला सूज आली होती. तो कळप सोडून नेरळ या गावाच्या लोकवस्तीत आश्रयाला आला होता. नेरळ येथे राहणारे पळसकर या कुटुंबाच्या मदतीने मोराचे प्राण वाचवले आहेत.
जखमी मोराच्या मागे कुत्रे-मांजर लागल्याने तो पळसकर यांच्या वाड्यात घाबरून तिथेच थांबला होता. त्या मोराला उडता येत नाही, हे पळसकर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी बाजूला राहत असलेल्या अंकुश दाभने व त्यांचे सहकारी पुंडलिक भोईर, वामन साळुंके, वैभव पळसकर, हेमंत पळसकर, शांताराम पळसकर यांच्या मदतीने पक्षी अभ्यासकांशी संपर्क साधला असता, त्यांनी या मोरावर उपचार करण्याचा सल्ला दिला. ग्रामस्थांनी वन अधिकारी निरगुडा यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडे त्या मोराला दिले. निरगुडा यांनी मोराला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नेऊन त्याच्यावर उपचार करून त्याला माथेरानच्या जंगलात सोडण्यात आले.