सायकल स्पर्धेत प्रांजल पाटील अंतिम विजेता, महिला गटात चैताली शिलधनकर प्रथम
By राजेश भोस्तेकर | Published: February 26, 2023 02:49 PM2023-02-26T14:49:58+5:302023-02-26T14:50:14+5:30
शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या हस्ते उदघाटन
अलिबाग : युवा शेकाप आणि बी यु प्रोडक्शन आयोजित अलिबाग क्रीडा महोत्सवातील सायकल स्पर्धेत पुरुष खुला गटात प्रांजल पाटील यांनी विजेते पद पटकावले. महिला खुला गटात चैताली शिलधनकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. अलिबाग क्रीडा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीची सुरुवात अलिबाग किनाऱ्यावरील वाळू मध्ये सायकल स्पर्धेने झाली . या स्पर्धेचे उदघाटन शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील , रायगड जिल्हा अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने , माजी नगरसेवक अनिल चोपडा आदी मान्यवरांच्या हस्ते झाले.
अलिबाग समुद्र किनाऱ्यावर सकाळी आठ वाजता सायकल स्पर्धेला सुरुवात झाली. प्रथम 14 वर्षाखालील मुलांचा गट सोडण्यात आला. यामध्ये ऋग्वेद गोतावडे याने प्रथम क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ जय म्हात्रे द्वितीय आणि जयवर्धन पाठक यांनी तृतीय क्रमांक पटकावला . 14 वर्षखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पूर्वा पाटील , द्वितीय मैथिली चव्हाण आणि तृतीय क्रमांक तनुश्री अंबुलकर यांनी पटकावला.
पुरूष गटाच्या खुल्या सायकल स्पर्धेत प्रांजल पाटील याने प्रेक्षकांची मने जिंकली. प्रांजल पाटील याने ही स्पर्धा अटीतटीच्या लढतीत जिंकली. चेतन नेमण द्वितीय आणि सनीत पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला . स्पर्धेचे विशेष म्हणजे या गटात पहिला आणि तिसरा क्रमांक पाटील बंधूंनी पटकावला. महिला खुला गटात चैताली शीलधनकर यांनी प्रथम तर पायल धनगर आणि श्रिया खेडेकर यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
वैज्ञानिक युगात स्पर्धा आहे. शैक्षणिक स्पर्धेबरोबरच क्रीडा स्पर्धा देखील महत्वाच्या आहेत . हे ओळखून युवा शेकाप आणि बी यु प्रोडक्शन यांनी अलिबाग क्रीडा महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले आहे. आज सायकल स्पर्धा आणि यापूर्वीच्या झालेल्या मॅरेथॉन , कुस्ती आणि शरीरसौष्ठव स्पर्धेतील सहभाग पाहता रायगड जिल्हा भविष्यात क्रीडा प्रकारात अव्वल स्थानावर जाण्याचे हे संकेत आहेत. असे शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी संगितले.
रायगड जिल्ह्यात खेळाचे महत्व अधिक आहे . आजच्या सायकल स्पर्धेतील स्पर्धकांचा उत्साह आणि स्पर्धा पूर्ण करण्याची स्पर्धकांची जिद्द रायगडाला ओलिम्पिकच्या दिशेने नेणारी आहे.असे अपर पोलीस आधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले .