पोलादपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ले प्रतापगडावर यावर्षी ३५५ मशाली तटबंदीला लावल्याने संपूर्ण प्रतापगड उजेडात न्हाऊन निघाला. निमित्त होते किल्ले प्रतापगडावरील भवानीमातेच्या मंदिराला ३५५ वर्षे पूर्ण झाल्याचे. प्रतापगडवासिनी भवानीमातेच्या मंदिराला ३५० वर्षे झाल्यापासून हा कार्यक्रम नवरात्रीमधील चतुर्थीला साजरा केला जातो. शिवभक्त आप्पासाहेब उतेकर यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या मशाल महोत्सवाचे हे ६ वे वर्षे. राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद लुटला.चतुर्थीला होणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात रात्री ८ वाजता करण्यात आली. सुरुवातीला प्रतापगड - वाडा कुंभरोशी येथील स्वराज्य ढोलपथकाने ढोलताशाच्या विविध वाद्य प्रकाराने अवघ्या शिवभक्तांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर भवानीमातेच्या मंदिरात मशाल प्रज्वलित करण्यात आली. खासे पंचवीस मावळे पेटत्या माशाली घेऊन शिवप्रताप बुरुजाकडे धावले. शिवप्रताप बुरुज ते भवानीमाता मंदिर या संपूर्ण तटबंदीला मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. सुरुवातीला शिवप्रताप बुरुजावरून तोफेची सलामी देण्यात आली. तोफेच्या गगनभेदी आवाजाने अवघा प्रतापगड परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर जय भवानी - जय शिवराय या जयघोषाने गडकोट दणाणून निघाला.३५५ मशालींच्या उजेडातील प्रतापगड शिवकाळ डोळ्यासमोर उभा करीत होता, तर फटाक्यांची आतषबाजी आधुनिक काळाची जोड देत होती. जाणता राजा या महानाट्याचे कलाकार व राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी महाआरतीनंतर भवानीदेवीच्या गोंधळाला सुरुवात केली. यावेळी सांगली येथील कलाकारांनी हलगी वाद्याचे सादरीकरण केले. या कार्यक्रमासाठी रोहा - माणगांव - श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.मशाल सोहळा यशस्वी करण्यासाठी आप्पा उतेकर, संतोष जाधव, आनंद उतेकर, राजू जंगम, बाळा झाडे व प्रतापगड ग्रामस्थ सहभागी झाले होते. तसेच मायभवानी सामाजिक संस्था प्रतापगड, शिवमुद्रा प्रतिष्ठान, स्वराज्य ढोलपथक, जाणता राजाचे सर्व शिवमावळ्यांसह राज्यभरातील अनेक शिवभक्तांनी या कार्यक्रमासाठी मदत केली. प्रतापगडावरील हा मशाल महोत्सव म्हणजे एक प्रकारची दिवाळीच असते. या मशालींच्या उजेडाने प्रतापगडाची शोभा आणखीच वाढते. या मशाल महोत्सवाबरोबरच येथे नवरात्रीत विविध कायक्रम साजरे केले जातात. (वार्ताहर)
३५५ मशालींच्या उजेडात न्हाऊन निघाला प्रतापगड
By admin | Published: October 17, 2015 11:44 PM