निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग - मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपैकी निवारा ही गरज अतिशय महत्त्वाची आहे. बदलत्या काळानुसार सिमेंट, काँक्रिटची छत असलेली पक्की घरे भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र, ग्रामीण भागात आजही चंद्रमौळी कौलारू घरांचे अस्तित्व कायम टिकून आहे.
जिल्ह्यात पावसाला सुरु होताच कौलारू घरांचे छत छावणीला वेग आला आहे. ग्रामीण भागात पूर्वी कुडा-मातीच्या भिंती व त्यावर गवताचे किंवा कवेलूचे छत असलेली घरे मोठ्या प्रमाणात दिसायची. मात्र, आधुनिकीकरणामुळे दिवसेंदिवस काळ बदलत गेला. हळूहळू मातीच्या घरांऐवजी सिमेंट काँक्रिटचे छत असलेली पक्की घरे बांधण्याकडे नागरिक वळू लागले. गावखेड्यात माकडांचा उच्छाद असतो. त्यामुळे माकडे कौलारू घरांच्या छताचे नुकसान करीत असतात. त्यासाठी मान्सूनपूर्व छत दुरुस्ती करणे गरजेचे असते.
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूत कवेलूची छत असलेली घरे आल्हाददायक असतात. छत दुरुस्ती करताना जुने मोडकळीस आलेले लाकूड फाटे बदलणे, पावसाळ्यात पावसाचे पाणी घराच्या छतातून टपकून घरात शिरू नये, यासाठी तुटफूट झालेली कवेलू बदलून त्याऐवजी नवीन कवेलू बसविणे, अशी दुरुस्ती कामे करावी लागतात. त्यासाठी दरवर्षी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. सध्या सिमेंटची पक्की घरे बांधकामाच्या साहित्याच्या किमती गगनाला भिडल्याने आपली कवेलूची छत असलेली झोपडीच बरी, असे म्हणण्याची वेळ आली आहे.घरांची संख्या अधिक -
ग्रामीण भागात कौलारु घरांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. शहर सारख्या ठिकाणी सिमेंटी घरांची बांधणी मोठ्या प्रमाणात असते. तर कौलारु घरे थंड असतात. त्यामानाने सिमेंटचे बांधकाम असल्यामुळे उष्णता अधिक जाणवते. त्यामुळे ग्रामीण भागात आजही कौलारु घरांची संख्या अधिक दिसून येते.