अलिबाग : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारांमुळे पशुधनाची हानी होते. त्यामुळे या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील गाय, म्हैस, शेळी- मेंढ्या आदी ७० हजार १६६ जनावरांचे लसीकरण करण्यात संबंधित विभागाला यश आले आहे.रायगड जिल्ह्यात तीन हजार मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडतो. अनेक वेळा पूरपरिस्थिती निर्माण होते. या बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजार होतात. यामुळे गायी, म्हशी, कोंबड्या, बकऱ्या पशू व पक्षांना घटसर्प, फन्या, आंत्रविषारसारखे रोग होतात. ताप येणे, श्वसननलिका सूजणे, नाकातून चिकट स्राव येणे ही घटसर्प आजाराची लक्षणे आहेत, या आजारावर वेळेत उपचार न केल्यास जनावरांचा मृत्यू होतो. या रोगामुळे जनावरांमधील प्रतिकारशक्ती कमी होते. उत्पादन क्षमता कमी होते. त्यामुळे या संसर्गजन्य रोगांवर मात करण्यासाठी तसेच नियंत्रण ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी महिनाभरापासून प्रत्येक तालुक्यात या लसीचे वितरण केले आहे. यातून आतापर्यंत ७० हजार जनावरांना लस देण्यात आली आहे.
अशी घ्या जनावरांची काळजी रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना योग्य असा पोषक आहार म्हणजेच क्षार व खनिजे यांचे मिश्रण द्यावे. लसीकरण करण्यापूर्वी एक आठवडा अगोदर जंतनाशक औषध द्यावे, तर लसीकरणानंतर जनावरांना अतिशय कष्टाची कामे करू देऊ नयेत. गाभण जनावरांना लस टोचू नये. लस देताना लसीची मात्रा व देण्याची पद्धत तंतोतंत पाळावी. लसीकरण से नेहमी दिवसाच्या थंड वेळेतच माणजेच सकाळी किंवा संध्याकाळी करावे. लस टोचलेल्या जागी कोणत्याही जंतुनाशकाचा वापर करू नये.